
किसान क्रेडिट कार्ड गरजेचेच! शेतकऱ्यांना मिळते तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
सोलापूर : जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात विविध बॅंकांकडून पीक कर्ज घेतात. शेतकऱ्यांना कर्जासाठी वारंवार कागदपत्रे द्यावी लागू नयेत या हेतूने त्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. शेतकऱ्यांचे क्षेत्र, आर्थिक व्यवहार आणि शेतातील पीक पाहून शेतकऱ्याचे क्रेडिट ठरविले जाते. त्यातून तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते.
राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिगरव्याजी दिले जाते. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघाती विमादेखील मिळतो. शेतकऱ्यांचे पीक बदलले किंवा क्षेत्रात वाढ झाल्यास क्रेडिट लिमिट वाढवून मिळते. दरम्यान, क्रेडिट कार्डवर कर्जाचे लिमिट मंजूर झाल्यानंतर शेतकरी त्याच्याकडील कार्डवरून खते, बी-बियाणे खरेदी करू शकतो. वर्षाच्या शेवटी त्याला त्या कर्जाचे नवे-जुने करता येते. जिल्हा मध्यवर्ती बॅंक बिगरव्याजी तीन लाखांपर्यंत पीक कर्ज देते. पण, राष्ट्रीयीकृत बॅंका सुरवातीला शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम घेतात आणि शासनाकडून व्याज मिळाले की संबंधित शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा करतात. बऱ्याच शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असून ज्याला कार्ड हवे आहे, त्यांना संबंधित बॅंकेकडे मागणी करता येते. जिल्ह्यातील जवळपास एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहेत. बॅंकांकडून जे शेतकरी कर्ज घेतात, त्यांनी किसान क्रेडिट कार्ड आवर्जुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी केले आहे.
जनावरांसाठीही कर्जाची सोय
आता शेतकऱ्यांकडील दुभती जनावरे (गायी, म्हशी) आणि शेळ्या, मेंढ्यांच्या पालनपोषणासाठी देखील बॅंकांकडून एक लाख ६० हजारांपर्यंत विनातारणी कर्ज मिळते. पण, बॅंकेकडून घेतलेले पीक कर्ज एक लाख ६० हजारांवर गेल्यास त्यासाठी तारण द्यावे लागते. त्याचे अर्ज पशुधन संवर्धन अधिकाऱ्यांकडून बॅंकांना पाठविले जातात. एक लाख ६० हजारांहून अधिक कर्जासाठी मात्र तारण द्यावे लागते.
क्रेडिट कार्डचे फायदे
किसान क्रेडिट कार्ड असलेल्याना कर्जासाठी पुन्हा पुन्हा द्यावे लागत नाहीत कागदपत्रे
शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार क्रेडिट कार्डचा वापर करून काढता येईल रक्कम
किसान क्रेडिट कार्डवर मिळतो दोन लाख रुपयांचा अपघाती विमा
क्षेत्र किंवा पीक वाढल्याची कागदपत्रे बॅंकेत दिल्यास क्रेडिट कार्डची वाढते मर्यादा
Web Title: Kisan Credit Card Is A Must Farmers Get An Interest Free Loan Of Up To Three
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..