बळीराजासाठी किसान रेल! आज बेंगलोरहून 'रो-रो' रेल्वे सोलापुरात; 'असा' पाठवा शेतमाल

324sp3_0 - Copy.jpg
324sp3_0 - Copy.jpg

सोलापूर : कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक बंद असून मोजक्‍याच गाड्या सोडल्या आहेत. लॉकडाउनमुळे हतबल झालेल्या बळीराजासाठी रेल्वे मंत्रालयाने एक पाऊल पुढे टाकून किसान रेल सुरू केली. सोलापूर विभागातील शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतुकीसाठी आठवड्यातील प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ही रेल्वे दानापूर, पटणा, बिहार याठिकाणी जाते.

जिल्ह्यातील सांगोल्याहून किसान रेल शेतमाल वाहून नेते. कुर्डुवाडी, दौण्ड, कोपरगाव, बेलापूर यामार्गे ही रेल्वे दानापूर, पाटणा याठिकाणी जाते. आंबा, डाळिंब, मिरची यासह अन्य शेतमालाची वाहतूक केली जात आहे. एका रेल्वेतून एकावेळी दोनशे टनापर्यंत शेतमाल वाहून नेण्याची क्षमता आहे. शेतकऱ्यांचा या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने आठवड्यातून दोनदा ही रेल्वे धावू लागली आहे. सांगोला ते दानापूर हा प्रवास सोळाशे किलोमीटरपर्यंत आहे. या अंतरावर शेतमाल पोहच करण्यासाठी शेतकऱ्याला प्रतिकिलो साडेचार रुपयांचा दर मोजावा लागतो.

ठळक बाबी...

  • सांगोला ते दानापूर (पटणा) या अंतरासाठी प्रतिकिलो साडेचार रुपयांचे भाडे
  • किसान रेल्वेतून शेतमाल नेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी करावा स्टेशन मास्तरशी संपर्क
  • दानापूर तथा अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी संबंधित शेतकऱ्यांची असायला हवी ओळख
  • किसान रेलमध्ये केवळ शेतकऱ्यांना शेतमालच वाहतूक करता येईल; मालासोबत जाण्यावर निर्बंध
  • शेतकऱ्यांना दहा किलोपासून ते 200 टनांहून अधिक शेतमाल विक्रीसाठी पाठविता येईल

किसान तथा रो-रो रेल्वेतून माल वाहतुकीची जबाबदारी रेल्वेची
शेतकऱ्यांचा शेतमाल दानापूर बाजारपेठेपर्यंत पोहच करण्यासाठी किसान रेल सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना दिल्ली, चेन्नई, केरळ, राजस्थानसह अन्य ठिकाणी शेतमाल घेऊन जाण्यासाठी किमान दोनशे टनापर्यंत शेतमाल असायला हवा. त्याठिकाणचे व्यापारी आणि संबंधित शेतकऱ्यांची ओळख असायला हवी. रेल्वेतून शेतमाल वाहून नेला जातो, शेतमालाच्या पैशांची जबाबदारी संबंधित शेतकरीच घेतात. दरम्यान, आज (रविवारी) बेंगलोरहून सोलापुरात रो-रो रेल्वे येणार असून 1 सप्टेंबरला ती बेंगलोरला रवाना होईल. 
- प्रदरप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे विभाग


'रो-रो' सेवेची आज ट्रायल
सोलापूर (बाळे) ते बेंगलोर अशी 'रो-रो' सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याची ट्रायल उद्या (रविवारी) घेतली जाणार असून बेंगलोरजवळील नेलमंगला रेल्वे स्थानकापासून ही रेल्वे 42 ट्रक घेऊन बाळे स्थानकावर येणार आहे. सोलापुरातील उदय पाटील यांनी त्याचा ठेका घेतला असून सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल तथा अन्य मालाची वाहतूक बेंगलोरपर्यंत करता येणार आहे. दरम्यान, बेंगलोरहून सोलापुरात आलेली रो-रो रेल्वे 1 सप्टेंबरला बेंगलोरला रवाना होणार आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क करून त्यांच्याकडील शेतमाल तथा अन्य वस्तू नेण्याची नोंदणी करावी, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com