esakal | काँग्रेसच्या बहुजन पायाचे शिल्पकार

बोलून बातमी शोधा

Keshavrao Jedhe
काँग्रेसच्या बहुजन पायाचे शिल्पकार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काँग्रेसचा पाया अधिक व्यापक करणारे आणि बहुजन समाजाला बळकट नेतृत्व देणारे केशवराव जेधे यांची आज सव्वाशेवी जयंती. प्रामाणिक आणि तात्त्विक भूमिका घेत त्यांनी वैचारिक वाटचाल केली आणि अनेक गोष्टी द्रष्टेपणाने मांडल्या. त्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि एकूणच त्यांच्या निमित्ताने झालेल्या स्थित्यंतराचा वेध.

यंदाचे वर्ष केशवराव जेधे यांच्या शतकोत्तर रजत जयंतीचे वर्ष आहे. केशवराव जेधे यांचे नाव सर्वसामान्य मराठी जनांच्या व प्रचलित राजकीय नेत्यांच्याही विस्मृतीत गेले आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाला भक्‍कम ग्रामीण पाया लाभला व तो बहुजनांचा पक्ष झाला हे केशवराव जेधे यांचे कर्तृत्व. या कर्तृत्वाच्या जोरावर अनेक वर्षे सत्ता भोगणाऱ्या पक्षाची ही अवस्था तर इतरांचाही विचारच करायला नको.

जेधे यांच्या सार्वजनिक जीवनाचे दोन टप्पे पडतात. पहिला टप्पा साधारणत: १९२१ पासून १९३० पर्यंतचा, ब्राह्मणेतर चळवळीचा, दुसरा टप्पा कॉंग्रेस व शेकाप व पुन्हा कॉंग्रेस असा जेधे यांच्यावरील प्रभाव आरंभी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेचा, नंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंचा, तिसरा प्रभाव गांधी नेतृत्वाचा व चौथा प्रभाव कार्ल मार्क्‍सच्या विचारांचा. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रभावाखाली कट्टर ब्राह्मणेतर चळवळीत जेधे-जवळकर ही जोडगोळी होती. महर्षी शिंदे यांच्या प्रभावातून व प्रेरणेतून जेधे कॉंग्रेसमध्ये गेले. तेव्हा जवळकर सुटले व जेधे-गाडगीळ हे नवे समीकरण तयार झाले. मार्क्‍सच्या विचारांचा प्रभाव पडल्यावर हेच समीकरण जेधे-शंकरराव मोरे असे झाले. जेधे यांचा राजकीय प्रवास हा ब्राह्मणेतर चळवळ, काँग्रेस, शेकाप व पुन्हा काँग्रेस असा झाला. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावरील त्यांच्यावरील प्रभाव (छत्रपती शाहू महाराज, महर्षी शिंदे, गांधी व मार्क्‍स यांचे) स्पष्ट दिसतात. सार्वजनिक जीवनात त्यांनी पुणे महापालिकेचे सभासद, मध्यवर्ती कायदे मंडळाचे सभासद (१९३५), द्वैभाषिक महाराष्ट्र-गुजराथच्या विधिमंडळाचे सभासद (१९५७), महाराष्ट्र प्रांतिक कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष (१९३८, १९४६-४८), संयुक्‍त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष (१९५५) आदी पदे भूषवली.

सामाजिक प्रश्‍नांवर ब्राह्मणेतर पर्वात जेधे आक्रमक होते. दिनकरराव जवळकर यांचे ‘देशाचे दुष्मन’ हे पुस्तक जेधे यांनी प्रकाशित केले. याबाबतच्या खटल्यात त्यांनी एक वर्ष कैदेची शिक्षाही सुनावली गेली; पण सत्र न्यायाधीशांच्या कोर्टात ते दोषमुक्‍त ठरले. या काळात काही अंशी त्यांच्या भूमिकेत ब्राह्मणविरोधही शिरला. चवदार तळ्याच्या सत्यागृहात ब्राह्मण सहभाग नको ही ते व जवळकर यांची भूमिका होती. ती डॉ. आंबेडकर यांनी अमान्य केली व नंतर उभय नेत्यांनीही ती मागे घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासंदर्भातही त्यांनी ब्राह्मण संस्थानिक समितीत नको ही भूमिका घेतली; पण नंतर ते स्वत:च या उपक्रमातून बाहेर पडले.

जेधे यांची सामाजिक भूमिका समतेची, न्यायाची होती. ब्राह्मणेतर चळवळीतून ब्राह्मणेतर पक्ष निर्माण झाला. त्यातही जेधे यांनी मनापासून काम केले. टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांच्याशीही त्यांचे जमले. कारण श्रीधरपंतांची भूमिका टिळकांपेक्षा मूलत: वेगळी होती. त्यांचा मनोपिंड हा समतेचा, शोषणविरोधी होता. म्हणूनच वि. रा. शिंदे यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, कामगारांचे प्रश्‍न सोडवणे यासाठी समाजसत्तावादाकडे त्यांची मनोभूमी सरकत होती. गांधी, नेहरूंची भूमिका त्यांना पटू लागली व कॉंग्रेसकडे त्यांचा कल झुकला. सन १९३० नंतर त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने व पुढे नेतृत्वाने महाराष्ट्र कॉंग्रेसचे सामाजिक स्वरूपच बदलून गेले. देव-देवाडीकरांची कॉंग्रेस आता जेधे-गाडगीळकरांची म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढे समाजसत्तावादाची वैचारिकता पक्‍की झाल्यावर कॉंग्रेसच्या मर्यादा त्यांना जाणवू लागल्या व ते पक्ष सोडून शेतकरी-कामगार पक्षात गेले. हे पक्षांतर अधिक मूलगामी व क्रांतिकारक स्वरूपाचे होते. तिथे शंकरराव मोरे यांची संगत त्यांना झाली; पण मोरे व ते तिथून पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले. शेकापच्याही मर्यादा त्यांना जाणवल्या व एकंदरीतच राष्ट्रीय राजकारण करण्यातच हित आहे. हे लक्षात घेऊन ते काँग्रेसमध्येच राहिले.

विविधांगी कर्तृत्व

जेधे यांच्या नेतृत्वाने सर्वांचा विश्‍वास जिंकला होता. पत्रकार, कार्यकर्ता, नेता अशी त्यांची विविध रूपे दिसतात. स्वच्छ प्रतिमा, ठाम वैचारिकता, न्याय व समतेची भूमिका, शोषणविरोध व लोकशाही निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. काँग्रेसचा प्रसार व प्रभाव वाढावा, यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा ग्रामीण भाग पिंजून काढला. महाराष्ट्र काँग्रेसचा पाया विस्तारून भक्‍कम केला व या अनुषंगाने लोकशाही राजकारणही तळागाळापर्यंत नेले.