

बालमित्रांनो, महाराष्ट्र दिनानिमित्त आपण पाहूया काय आहेत आपल्या राज्याची मानचिन्हे.
- प्रा. किशोर सस्ते, वनस्पती आणि जैवविविधता अभ्यासक
बालमित्रांना महाराष्ट्र दिनानिमित्त भेटण्यासाठी, रंगीबेरंगी, आकर्षक आणि सुंदर अशी कांदळवनातील सफरचंद, जारुळ फूल, आंबा, मोठी पण लाजाळू खारूताई आणि हिरव्या रंगाचा हरियाल पक्षी आणि मखमली फुलपाखरू आलेले आहेत! हे सगळे मित्र आपल्या राज्याची मानचिन्हे आहेत. चला तर मग, आपण सगळ्यांची ओळख करून घेऊ. या सगळ्या मानचिन्हांचे आपण भविष्यात संगोपन आणि संवर्धन करावे, हा यामागचा उद्देश आहे.
आंबा
सर्वांच्या परिचयाचे सुमधूर, महाराष्ट्राचे राज्य फळ म्हणजे आंबा. याचे शास्त्रीय नाव मॅंजिफेरा इंडिका असे आहे. संकरीत जातीशिवाय आंब्याच्या अनेक रायवळ जाती आहेत, त्या जतन केल्या पाहिजेत.
शेकरू
राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारी खारीच्या कुळातील मोठी रुबाबदार आणि लाजाळू खार म्हणजे ‘शेकरू’. याचे प्राणीशास्त्रीय नाव ‘राटूफा इंडिका’ असे आहे. ती आर्द्र पानझडी आणि सदाहरीत जंगलांत, म्हणजे महाबळेश्वर, भीमाशंकर, अंबोली, ताडोबा अभयारण्यात आणि कोकणात आढळते शेकरूचे वजन दोन ते अडीच किलो असते, लांबी ३ फूट असते. गुंजेसारखे लालभडक डोळे, मिशा, तपकिरी रंग आणि झुबकेदार शेपटामुळे झाडावर आपला तोल सांभाळते, हे वैशिष्ट्य आहे.
ही खार बांबू, अर्जुन, जांभुळ आणि रिठा या झाडांवर सर्वांत जास्त घरटे बांधते. शत्रूपासून आपल्या पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी अनेक झाडांवर घरटे बांधून फक्त एखाद्याच घरट्यात पिल्लांना जन्म देते. वेगवेगळ्या हंगामात येणारी आंबा जांभूळ आणि फणस यांसारखी इतर झाडांची सुमधुर फळे, फुले आणि झाडांची साल शेकरू खाते. त्यामार्फत बीजप्रसार होऊन जंगल वाढण्यास मदत होते.
सध्याची परिस्थिती : शेकरू हा भारताच्या पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ट प्राणी खूप दुर्मिळ आहे. खार ज्या झाडावर घरटे बांधते, ती झाडे दैनंदिन वापरासाठी मोठ्या प्रमाणावर तोडण्यात येत आहेत. २०२०मध्ये शेकरूची शिकार केल्यामुळे आरोपींना शिक्षा करण्यात आली होती.
ब्लू मॉरमॉन फुलपाखरू
मखमली काळ्या पंखावर निळ्या रंगाची छटा असलेले विलक्षण सुंदर असे ब्लू मॉरमॉन किंवा राणी पाकोळी हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. याचे प्राणीशास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिमॅनेस्टोर आहे. हे भारताच्या पश्चिम घाट आणि श्रीलंकेतील अतिपावसाच्या प्रदेशात आढळते. याच्या पंखाची लांबी १२ ते १५ सेंटिमीटर असते. याचे सुरवंट लिंबूवर्गीय वनस्पती, कवठ, कढीपत्ता आणि बेल याची पाने खाऊन राहतात.या फुलपाखराला २०१५मध्ये राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. आकाराने हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि सुंदर फुलपाखरू आहे.
जारूळ
मेहंदीच्या कुळातील, गुलाबी रंगाच्या पाकळ्यांवर चुणीदार घड्या पडलेले आणि सुंदर झालर असलेले मनमोहक फूल म्हणजे जारूळ. या वृक्षास गावाकडे ‘नाणा’ किंवा ‘बोंडारा’ देखील म्हणतात. ऊन लागल्यावर याची फुले फिक्कट निळसर रंगाची होतात. याला शास्त्रीय भाषेत लाजेस्ट्रोमिया स्पेसिओसा असे आहे. या वृक्षाच्या फुलास राज्य फुलाचा दर्जा देण्यात आला आहे. याला अनेक गुणधर्मामुळे प्राइड ऑफ इंडिया असे देखील म्हणतात. हा वृक्ष बागेत देखील लावला जातो.
हरियाल
राज्य पक्षी म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी आहे. कबुतराच्या वंशातील हरियाल या पक्षास, ‘येलो फुटेड ग्रीन पिजॉन’ असे देखील म्हणतात. याचे प्राणीशास्त्रीय नाव ट्रेरॉन फोइनीकॉपटेरस असे आहे, याला मराठीत पिवळ्या पायाचा हरोळी असे संबोधले जाते. हा पक्षी भारतीय उपखंड, दक्षिण पूर्व आशिया आणि चीन येथे आढळतो.
वैशिष्ट्ये - हरियाल आपले पाय जमिनीवर कधीही ठेवत नाही. शिकाऱ्याची चाहूल लागताच हा पक्षी अनेकदा मरण्याचे नाटक करतो. तो वड, पिंपळ, उंबर, आंबा, पायर या वृक्षांची फळे खातो. या फळांमध्ये असलेल्या ओलसरपणामुळे त्याची तहान भागते, त्यामुळे तो पाणी पिण्यासाठी कधीही जमिनीवर उतरत नाही, असे म्हणतात. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी कोतवाल पक्षाच्या घरट्याशेजारी किंवा आपल्या पंखांच्या रंगासारखी पाने असणाऱ्या झाडांवर हा घरटे बांधतो.
सध्याची परिस्थिती - विकासकामांमुळे तोडल्या जाणाऱ्या वड, पिंपळ आणि उंबरवर्गीय वृक्षांची बेसुमार तोड हरियालची संख्या कमी होण्यास कारणीभूत आहे.
कांदळवनातील सफरचंद
महाराष्ट्रातील ७२० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीलगत असणाऱ्या खारफुटीच्या जंगलांना कांदळवन असे म्हणतात. कांदळवन म्हणजे खारट पाण्यात वाढणारे जंगल! याच कांदळवनात वाढणाऱ्या सुवासिक, पांढरी चीप्पी फुलास म्हणजेच सोनेरशिआ अल्बा’ या वनस्पतीला महाराष्ट्राच्या राज्य वृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. कांदळवनातल्या वृक्षास राज्य वृक्षाचा दर्जा देणार महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. ७ ऑगस्ट २०२० रोजी हे मानांकन देण्यात आले. साचलेले पाणी आणि दलदलीमुळे पाण्यातील मुळांना श्वसन करणे अवघड जाते. म्हणूनच या वनस्पतींना पाण्याच्या बाहेर विशिष्ट प्रकारची मूळे असतात, त्यांना निमॅटोफोर असे म्हणतात. या मुळांद्वारे ते हवेतील ऑक्सिजन घेतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.