Sambhaji Brigade: शिवसेनेशी युती करणाऱ्या संभाजी ब्रिगेडबद्दल माहितीये का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Brigade

शिवसेनेशी युती करणाऱ्या संभाजी ब्रिगेडबद्दल माहितीये का?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला बंड केल्यानंतर आता शिवसेना वाचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून धडपड केली जात आहे. आज संभाजी ब्रिगेड ही संघटना शिवसेनेसोबत येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाल्यात. पण ही संभाजी ब्रिगेड ही संघटना काय आहे? या संघटनेची स्थापना कधी झाली आपल्याला माहितीये का?

१ सप्टेंबर १९९०. पुरूषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे मराठा सेवा संघाची स्थापना केली. ते जेव्हा सरकारी बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते तेव्हा मराठा कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांची संघटना स्थापन करायचे ध्येय त्यांचे होते. या संघटनेने पुढे ३० पेक्षा अधिक विभाग सुरू केले. त्यामध्ये महिलांसाठी काम करणारी जिजाऊ ब्रिगेड आणि तरूणांसाठी काम करणारी संभाजी ब्रिगेड हे विभाग कायम चर्चेत राहिले.

पुढे संभाजी ब्रिगेड विविध घटनांसाठी चर्चेत राहिली, त्यामध्ये २००४ मध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला करणे असो किंवा दादोजी कोंडदेव हा राज्य शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार रद्द करण्याची मागणी असो, गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करणे असो, किंवा पुण्यातील संभाजी उद्यानाला राम गणेश गडकरी यांचं नाव बदलून संभाजी उद्यान करेपर्यंत केलेला संघर्ष. अशा अनेक घटनांसाठी संभाजी ब्रिगेड या संघटनेला ओळखलं जातं. पुण्यातील राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकामधून शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता त्यामुळे गडकरी यांचा पुतळा या संघटनेने फोडून नदीत फेकला होता.

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या लिखाणावर संभाजी ब्रिगेडचा कायमच आक्षेप राहिला आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यावरूनही संभाजी ब्रिगेडकडून विरोध झाला होता. त्याबरोबर पुरंदरे यांच्यावरही शाईफेक करण्यात आली होती. पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपती' या कांदंबरीवर विडंबन करणारी 'पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर' ही कादंबरी आ.ह. साळुंखे यांनी लिहिली. त्या कादंबरीचा प्रसार आणि प्रचार संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला.

हेही वाचा: संघाची विचारसरणी भाजपला मान्य आहे का? ठाकरेंचा भाजपला सवाल

हेही वाचा: मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार

साल २०१६. मराठा सेवा संघाचा एक भाग असलेल्या संभाजी ब्रिगेडने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याच नावाने पक्षाची स्थापन केली होती. त्यानंतर आता राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि शिवेसनेत उभी फूट पडली, राज्यात सत्तांतर झालं नंतर, महाविकास आघाडीत खटके उडू लागले आणि संभाजी ब्रिगेडने शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला. आता इथून पुढे राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडकडून संयुक्त मेळावे घेण्यात येतील. त्यामुळे भगदाड झालेल्या शिवसेनेला संभाजी ब्रिगेड ठिगळ लावेल का? असा प्रश्न निर्माण होतोय.

Web Title: Know About Sambhaji Brigade Which Alliance With Shivsena Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..