जिल्हा बॅंकेत दबावामुळे अध्यक्षपद स्वीकारले; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट l Hasan Mushrif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hasan mushrif

KDCC: जिल्हा बॅंकेत दबावामुळे अध्यक्षपद स्वीकारले; हसन मुश्रीफ

कोल्हापूर : जिल्हा बॅंकेच्या (KDCC )निवडणुकीत सार्वत्रिक दबावामुळे मला अध्यक्ष व्हावे लागले. सत्तारूढमध्ये बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना आमदार विनय कोरे (Vinay Kore)यांचा विरोध होता, त्यातून कोरे यांनी दुसरे पॅनेल केले असते म्हणून आसुर्लेकर यांची समजूत काढून इतर उमेदवार देण्याचा प्रस्ताव खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनीही मान्य केला होता; पण सेनेच्या दबावामुळे प्रा. मंडलिक सत्तारूढमधून बाहेर गेले, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली. अध्यक्षपदी निवडीनंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रतील ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्याचे ग्रामविकास मंत्रिपद, पाच कोटी कामगारांचे कामगारमंत्रिपदही माझ्याकडे आहे. यातून बॅंकेला वेळ देता आला पाहिजे. त्यामुळे, बँकेचे अध्यक्ष व्हावे असे वाटत नव्हते. पण निवडणुकीत जे काही राजकारण झाले, याचा सार्वत्रिक दबाव आला. श्रेष्ठींकडूनही दबाव होता. त्यामुळे बॅंकेचा अध्यक्ष झालो.’’

कोरे यांनी आमच्या उमेदवारांना ज्या तालुक्यात मते कमी पडली ते जाहीरपणे सांगितले आहेत. कोणाला किती कमी मते मिळाली हे जगजाहीर आहे. असे सांगून कालच्या अध्यक्ष निवडीवेळी ते बँकेतच येणार होते. त्याआधी त्यांनी शासकीय विश्रामगृहात चर्चा करावी. कोणी काय केले हे समोरासमोर सांगावे असेच मी सांगितले. अशी चूक दुरुस्त केली जाईल, असेही ठरल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

आमदार कोरे यांचा आसुर्लेकरांना वैयक्तिक विरोध होता. आसुर्लेकर जर सत्तारूढच्या पॅनेलमध्ये असते तर विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील यांचा अर्जुन आबिटकर यांना सत्तारूढ पॅनेलमध्ये घेण्यास विरोध झाला असता त्यामुळे अर्जुन आबिटकर, आमदार पी. एन. पाटील यांनी चंद्रदीप नरके यांना सत्तारूढमध्ये विरोध केला असता त्यामुळे नरके आमच्यासोबत आले नसते. स्वाती कोरी, अशोक माने असे पॅनेल तयार केले जाणार असल्याचेही श्री कोरे यांनी सांगितले होते. तरीही तडजोडीने एकत्र लढण्यास तयार होता. प्रा. मंडलिक यांनाही ही स्थिती सांगितली होती, असेही श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले.

लक्षात ठेवले तर परिणाम होईल

सत्तारूढ पॅनेलमधील काहींनी मते दिली नसल्याचा भविष्यात राजकारणावर परिणाम होईल का, असा प्रश्‍न केला. यावर मुश्रीफ म्हणाले, ‘‘मोठ्या मनाने ते विसरले तर ठीक आहे; पण त्यांनी लक्षात ठेवले तर मात्र याचे पडसाद उमटतील. हे होऊ नये यासाठी प्रयत्न केला.’’

कोरेंसारखा मित्र गमावला असता

बॅंकेचे मतदान तालुका आणि गटनिहाय मोजल्यामुळेच कोणत्या तालुक्‍यात किती मते मिळाली हे समजले. मतदान एकत्र मोजले नसते तर ‘गोकुळ’मध्ये जसा संजय मंडलिक यांच्या मुलाचा पराभव माझ्यामुळेच झाल्याचा विनाकारण डाग लागला तोच डाग बँकेच्या निवडणुकीत पराभूत उमेदवारांचा डाग मला लागला असता. यातून कोरे यांच्यासारखा चांगला मित्र गमावला असतात. त्यामुळे तालुका आणि गटनिहाय मतमोजणी झाली हे योग्य झाले, असा खुलासा मुश्रीफ यांनी केला.

Web Title: Kolhapur District Bank President Election Accepted Due To Pressure Post Hasan Mushrif Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top