छत्री दुरुस्तीतूनच शोधला जीवनाधार 

राजू कुलकर्णी
शुक्रवार, 30 जून 2017

कोल्हापूर - परिस्थिती आणि पोटाची भूक माणसाला जगायला शिकवते, याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मुरगूड येथील कमळाबाई बाळकृष्ण डवरी. पतीच्या निधनानंतर छत्री दुरूस्तीचा व्यवसाय करत त्या आपल्या पोटाची खळगी भरत आहेत. पावसाळ्याची चाहूल लागली की, त्यांच्या छत्री दुरूस्तीच्या व्यवसायची लगबग सुरू होते. जिल्ह्यात किंवा राज्यात अशी एकच वृध्द महिला छत्री दुरूस्तीचा व्यवसाय करणारी असेल, असे येथील व्यापारी सांगतात. 

पती बाळकृष्ण डवरी यांच्याबरोबर मजल-दरमजल करीत त्यांना कमळाबाई व्यवसायात मदत करीत होत्या. त्यातूनच त्यांनी ही कला अवगत केली. त्यांच्या पतीचे निधन झाले आणि व्यवसायासह संसाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. सोबतीला असलेला मुलगाही काही काळानंतर सोडून गेला. यातूनही त्या डगमगल्या नाहीत. कामावर आणि मेहनतीवर त्यांनी आपला संसारगाडा चालवायला सुरवात केली. मुरगुडच्या घरात त्या आता एकट्याच असतात. सध्या कमळाबाई नऊवारी साडीत त्या छत्री दुरूस्तीच दुकान बाजारात मांडतात. अगदी सराईत कारागीरासारखे त्यांचे हात चालत असतात. चाळीस वर्षे त्या हा छत्री दुरूस्तीचा व पत्र्याचे डबे करण्याचा व्यवसाय करत आहेत. मुरगुड आणि गारगोटी येथील आठवडा बाजार येथे मिळेल, तेवढा व्यवसाय करून त्यात त्या समाधानी आहेत.

पावसाळ्यानंतर त्या पत्र्याचे डबे, घागरी दुरूस्ती अशी कामे करतात. त्या म्हणाल्या, ""आता प्लास्टीकची दुनिया आल्याने भांड्यांचीही कामं मिळत नाहीत. पण प्रामाणिकपणे कष्ट करून जे मिळतं, त्यात समाधान मिळते.'' 

Web Title: kolhapur news kamlabai dawri Umbrella repair