
नाशिक : कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देताना निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल, असे भव्य आणि संस्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नानाच्या तारखा घोषित केल्या.