आमदारांच्या कोरोना चाचणीसाठी रविवारी प्रयोगशाळा राहणार सुरु 

प्रमोद बोडके
Saturday, 5 September 2020

परवाना रद्दचाही आदेश 
आमदारांची चाचणी केल्यानंतर ज्या प्रयोगशाळा रविवारी त्यांचा रिपोर्ट देवू शकत नाहीत, त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आमदारांच्या चाचणीचा रिपोर्ट विधानमंडळ सचिवालयाला सादर केला जाणार आहे. 

सोलापूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (ता. 7) सुरुवात होणार आहे. अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी राज्यातील प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रयोगशाळा उद्या (रविवार, ता. 6) सुरु ठेवण्याचे आदेश विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिले आहेत. या आदेशानूसार आमदारांना त्यांची कोरोना चाचणी करुन घेणे अधिक सुलभ होणार आहे. 
अधिवेशनावर कोरोनाचे संकट असल्याने राज्य सरकारच्यावतीने कोरोनाबाबतची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्या त्या जिल्ह्यातील आमदारांची कोरोना चाचणी करुन त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विधानमंडळ सचिवाला पाठविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची कोरोनाची चाचणी करणे आवश्‍यक असल्याने सोलापूर जिल्ह्यातील आरटी- पीसीआर चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा उद्या (रविवार, ता. 6) सुरू ठेवण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 

विधानमंडळाच्या सर्व सदस्यांना शनिवारी आणि रविवारी त्यांच्या गावाजवळील शासनमान्य किंवा शासकीय प्रयोगशाळेत कोरोनाच्या चाचण्या करणे शक्‍य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांच्या चाचणीचा रिपोर्ट त्यांना त्वरित उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी त्यांच्या जवळच्या प्रयोगशाळेत चाचण्या करून घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The laboratory will be open on Sunday for MLA corona tests