Lalbaug Murder: लालबाग हत्याकांडात नवा ट्विस्ट! आईचा शिडीवरून पडून मृत्यू, नंतर शरीराचे तुकडे अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lalbaug Murder Case

Lalbaug Murder: लालबाग हत्याकांडात नवा ट्विस्ट! आईचा शिडीवरून पडून मृत्यू, नंतर शरीराचे तुकडे अन्...

लालबाग हत्याकांडामधील आरोपी रिंपल हीने पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती दिली आहे. अखेर तिने आईची हत्या का केली? याचा खुलासा तिने पोलिसांसमोर केला आहे. आपल्या जन्मदात्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या रिंपल जैन हीने मुंबई पोलिसांच्या चौकशीमध्ये मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली काहीही कारण नसताना वारंवार आई टोकायची. यामुळे ती अस्वस्थ झाली. अशात दुसरीकडे, तिच्या आईचा शिड्यांवरून खाली पडून मृत्यू झाला. तेव्हा आरोपाच्या भीतीने तिने आईच्या मृतदेहाचे ५ तुकडे केले, असं तिने पोलिसांना सांगितलं आहे.

दरम्यान, इमारतीतील एका रेस्टॉरंटमधील कर्मचार्‍यांपैकी एकाने, रिंपल जैनला तिची आई वीणा पडल्यानंतर तिला त्यांच्या घरी घेऊन जाण्यास मदत केली होती. त्या व्यक्तीने पोलिसांना या प्रकरणासंदर्भात धक्कादायक माहिती दिली आहे. त्या व्यक्तीने सांगितले की, “आंटी (वीणा) श्वास घेत नाहीत” असं त्याने रिंपलला सांगितलं होतं. यानंतर कर्मचाऱ्यांनी रिंपलला वीणाला हॉस्पिटलकडे घेऊन जायचं आहे का? असंही विचारलं आणि तिला तिच्या नातेवाईकांना सांगण्यास देखील सांगितलं होतं. परंतु, तिने त्यांना हाकलून दिलं आणि मी मॅनेज करेन असं म्हणाली होती.

मुंबईतील लालबाग चाळीत राहणाऱ्या आरोपी रिंपलने पोलिसांच्या चौकशीत कबूल केले आहे की, मृतदेहाचे तुकडे २ महिने घरात ठेवल्याने दुर्गंधी येऊ लागली होती. यामुळे ही दुर्गंधी दूर करण्यासाठी तिने चहाची पाने, फिनाईल आणि एअर फ्रेशनरच्या तब्बल ४० बाटल्यांचा वापर केला. ही बाब उघड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी आरोपी रिंपल जैन हिला अटक केली होती.

याप्रकरणी अधिक चौकशीसाठी तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी मुलगी रिंपलने पोलीस चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मार्ग इंटरनेटवर शोधला आणि नंतर जवळच्या दुकानातून मार्बल कटर विकत घेतला.

मृतदेह २ दिवस घरात ठेवल्यानंतर दुर्गंधी वाढू लागल्यानंतर पुन्हा रिंपलने इंटरनेटवर दुर्गंधी जाण्यासाठी काय करावं हे शोधलं. त्यानंतर तिने ऑनलाइन चहाची पानं, फिनाईल आणि एअर फ्रेशनर खरेदी करून त्यांचा वापर केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंपलने आपल्या जबाबात सांगितले की, गेल्या वर्षी २७ डिसेंबर रोजी तिची आई पायऱ्यांवरून पडून गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर २ दिवसांनी वीणा यांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :murdermurder case