

सिनेदिग्दर्शक माधव शिंदे, हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर.
Sakal
साधारण १९४१-४२चा काळ असेल. नवयुग फिल्म कंपनीत ‘तुझाच’ चित्रपटानंतर ‘मंगळागौर’ चित्रपटाची तयारी सुरू होती. लताला नायिकेची संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते. नव्या नायिकेला पeहावयास मी अधीर झालो होतो. ‘मंगळागौर’च्या मुहूर्ताच्या दिवशी मेकअप रूममध्ये स्नेहप्रभा प्रधान दिसल्या, परंतु लताबाई दिसल्या नाहीत आणि दोन दिवसांनी श्रीपाद जोशींबरोबर लहानगी लता स्टुडिओत आली. मला वाटलं नायिका मोठी असेल. त्या एवढ्याशा मूर्तीची आणि माझी ओळख त्यावेळी झाली नाही. चित्रित झालेली फिल्म घेऊन मी पुण्याहून मुंबईला रोज जात होतोच. एक दिवस लताची चित्रित फिल्म डेव्हलप झाली आणि सर्वांच्या आधी मी लतास पडद्यावर पाहिले. ही लतासंबंधी माझ्या आयुष्यातील फार मोठी घटना आहे.
‘नवयुग’ सोडून मा. विनायकरावांनी प्रफुल्ल फिल्म कंपनी काढली आणि मी पुण्याहून कोल्हापूरला त्यांच्याकडे आलो. ‘प्रफुल्ल’च्या प्रत्येक चित्रपटात लताबाईंना गाणी आणि भूमिका असावयाची. विनायकरावांनी १९४५च्या सुमारास कोल्हापूरही सोडले आणि आम्हा सर्वांसह ते मुंबईला आले. ‘प्रफुल्ल’चे सर्व युनिट गिरगावच्या विष्णूबाग येथे ठेवण्यात आले. मीही तेथेच राहू लागलो.