नेत्याने पैसे खाऊन तिकीट कापले; काँग्रेसच्या मुलाखतीत गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

‘एका बिल्डरच्या सांगण्यावरून महापालिका निवडणुकीत माझे तिकीट कापण्यात आले. त्यासाठी प्रदेशच्या एका नेत्याने पैसे घेतले. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी हे सिद्ध करू शकतो,’’ असा गौप्यस्फोट मुलाखतीदरम्यान एका इच्छुक उमेदवाराने केला. तर ‘‘१९८० पासून मुस्लिम समाजाला आजपर्यंत एकदाही संधी दिली गेली नाही. आम्ही कायम दुसऱ्या समाजासाठी काम करायचे का,’’ असा सवाल एका इच्छुकाने केला. त्यावर निरीक्षकांना गप्प राहण्याशिवाय पर्याय उरला नाही.​

पुणे - ‘एका बिल्डरच्या सांगण्यावरून महापालिका निवडणुकीत माझे तिकीट कापण्यात आले. त्यासाठी प्रदेशच्या एका नेत्याने पैसे घेतले. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी हे सिद्ध करू शकतो,’’ असा गौप्यस्फोट मुलाखतीदरम्यान एका इच्छुक उमेदवाराने केला. तर ‘‘१९८० पासून मुस्लिम समाजाला आजपर्यंत एकदाही संधी दिली गेली नाही. आम्ही कायम दुसऱ्या समाजासाठी काम करायचे का,’’ असा सवाल एका इच्छुकाने केला. त्यावर निरीक्षकांना गप्प राहण्याशिवाय पर्याय उरला नाही.

काँग्रेसच्या वतीने मंगळवारी शहर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती निरीक्षक जयवंतराव आवळे आणि प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडल्या. या वेळी काही इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले, तर काही इच्छुकांनी कशा प्रकारे आपल्यावर अन्याय झाला, याची व्यथा निरीक्षकांसमोर मांडली.

पुणे कॅंटोन्मेंटमधून इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने आपल्या पक्षात पैसे घेऊन कसे तिकीट कापले जाते, हे थेट सर्वांसमोर निरीक्षकांना सांगितले. त्या वेळी निवड समितीचे सदस्यही अवाक्‌ झाले. ‘‘गेली ३५ वर्षे मी राजकारणात आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळेस २८ जणांचे पॅनेल मी तयार केले होते. परंतु, ऐनवेळी माझेच तिकीट कापले. त्यासाठी एका बिल्डरने प्रदेश पातळीवरील एका नेत्याला पैसे दिले. हे मी सिद्ध करू शकतो. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. माझा काय दोष आहे, दरवेळेस मला डावलले जाते,’’ अशा शब्दांत या इच्छुकाने रोष व्यक्त केला. तर, कसब्यातील एका इच्छुकाने ‘‘मुस्लिम समाजाला संधी मिळणार आहे की नाही,’’ असा सवाल केला.

पर्वतीतील एका इच्छुकाने ‘‘माझ्या प्रभागातील कामावर शहरात आठही मतदारसंघांत विजय मिळू शकतो,’’ असा दावा केला. तर, ‘‘हडपसर हा मतदारसंघ काँग्रेसला मानणारा आहे. त्यामुळे आघाडी झाली, तर हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या,’’ असा आग्रह एका माजी आमदाराने 
धरला. 

‘लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराने आमचे ऐकले असते, तर आपल्या पक्षावर ‘लीड’ बसला नसता,’’ असा दावा एका इच्छुकाने केला. त्यावर निरीक्षकांनी केवळ ‘बघतो’, ‘तुमचे काम चांगले आहे,’ असे सांगत इच्छुकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. आठही विधानसभा मतदारसंघांत मिळून एकूण ५७, तर पिंपरी-चिंचवड येथील तीन इच्छुकांनी मुलाखती दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader take money and cut election ticket Congress Politics