आम्ही गरजणारे नव्हे बरसणारेच: विधान परिषदेत अमल महाडिकच विजयी होणार : Chandrakant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CHANDRKANT PATIL

आम्ही गरजणारे नव्हे बरसणारेच: विधान परिषदेत महाडिकच विजयी होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: भारतीय जनता पक्षाचे अधिकृत १०५ मतदार आहेत. आमदार विनय कोरे आणि प्रकाश आवाडे (Prakash Awade) गट मिळून ही संख्या १५१ पर्यंत जाते. आम्हाला विजयासाठी आता ५७ मतांची गरज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून मतदारांची संख्या ११८ आहे. त्यांना विजयासाठी तब्बल ९० ते १०० मतांची गरज आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी २७० मतांचा केलेला दावा हास्यास्पद आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) यांचा विजय निश्चित आहे; पण आम्ही गरजणारे नाही तर बरसणारे आहोत, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. काल प्रकाश आवाडे यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी ही भाजप, मित्रपक्षांची बैठक झाली.

बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये दौरा केला. शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजी येथील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची भेट घेतली. विधान परिषदेला मतदान करणाऱ्यांची संख्या कागदावर मांडली तर भाजपचा विजय निश्चित आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी २७० मतांचा दावा केला; पण तो हास्यास्पद आहे. कारण काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले असे मतदार केवळ ३६ आहेत.

राष्ट्रवादी आणि शिवसेना तसेच त्यांचे मित्र पक्ष असे मिळून हा आकडा ११८ होतो. भाजपला जिंकण्यासाठी ५७ मतांची गरज आहे. महाविकास आघाडीला ९० ते १०० मते लागणार आहेत; पण तरीही ते विजयाचा दावा करत आहेत. काही ढग गरजणारे असतात. त्यापैकी ते आहेत. आम्ही बोलत नाही करून दाखवतो. कारण आम्ही गरजणारे नाही तर बरसणारे आहोत.’’

बैठकीला माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, प्रा. जयंत पाटील, सुहास लटोरे, राहुल आवाडे, जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समीत कदम उपस्थित होते.

आघाडी टिकणार कशी : कोरे

जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे म्हणाले, ‘‘विधान परिषदेनंतर लगेचच जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक आहे. जे आत्ता महाविकास आघाडी म्हणून एकत्र दिसतात त्यांना परस्परांच्या विरोधातच निवडणूक लढवावी लागणार आहे. अशा वेळी ते विधान परिषदेला एकत्र कसे राहतील. त्यांना आपापले गट टिकवायचे असतील तर भूमिकाही वेगळ्या घ्याव्या लागतील. त्यामुळे महाविकास आघाडीची मते एक गठ्ठा राहतील का?’’

आम्ही भाजपबरोबरच : आवाडे

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, ‘‘इचलकरंजी आणि हुपरी येथील येथील नगरसेक आणि जिल्हा परिषद सदस्य असे मिळून २३ मतदार आवाडे गटाचे आहेत. आम्ही सर्व भाजपबरोबर आहोत. त्यामुळे भाजपचा विजय नक्की आहे.’’

हेही वाचा: गरजेल तो पडेल काय ; 270 च्या मॅजिक फिगर दाव्यावर पाटलांचा टोला

आम्ही व्यक्तिगत मदतही केली

सतेज पाटील यांनी भरघोस निधी दिला आहे, असे विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘कोरोनामुळे त्यांना फारसा निधी देता आला नाही; मात्र सत्ता असताना आम्ही पाच वर्षांत भरघोस निधी दिला आहे. या शिवाय बऱ्याच सदस्यांना मी व्यक्तिगत मदतही केली आहे.’’

loading image
go to top