विधान परिषदेसाठी सुनील तटकरे अडकले भास्कर जाधवांच्या चक्रव्यूहात... ; Konkan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhaskar Jadhav,Sunil Tatkare

खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे.

विधान परिषदेसाठी तटकरे अडकले भास्कर जाधवांच्या चक्रव्यूहात...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : विधान परिषदेत कुणबी समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिले आहे. शिवसेनेकडून त्यांच्या या शब्दाचे राजकीय भांडवल करण्यास सुरुवात झाली आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शनिवारी बोलताना तटकरे यांनी कुणबी समाजाला दिलेला शब्द पाळावा आणि विधान परिषदेची उमेदवारी द्यावी. त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी माझी व शिवसेनेचे ताकद उभी करू, असे आव्हान देत तटकरेंना चक्रव्यूहात अडकवले आहे. आता तटकरे ते चक्रव्यूह कसे भेदणार आणि विधान परिषदेच्या २०२४ च्या निवडणुकीत कुणबी समाजाला संधी देणार की पुन्हा आपल्याच मुलाला आमदार करणार, याकडे कोकणवाशियांचे लक्ष लागून राहिले आहे.

खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. या भागातील कुणबी समाजाला त्यांनी टार्गेट केले आहे. ते करताना त्यांनी कुणबी समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावरून तटकरेंना मात्र शब्दात पकडण्याची खेळी शिवसेनेकडून सुरू झाली आहे.

इतर राजकीय नेत्यांप्रमाणे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या घरातील सदस्यांना राजकारणात संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे भाऊ अनिल तटकरे विधान परिषदेवर सदस्य होते. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून राजीव साबळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. पण त्यांना डावलून अवधूत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे साबळे यांनी पक्ष सोडला. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी राखीव होते. पक्षातील ज्येष्ठ महिलांना डावलत तटकरेंनी मुलगी आदिती तटकरेंना अध्यक्षपदी बसविले. रोहा शहराच्या नगराध्यक्षपदासाठी समीर शेडगे आणि संदीप तटकरे इच्छूक होते. त्यांना डावलून तटकरे यांनी आपले व्याही संतोष पोटफोडे यांना नगराध्यक्ष केले.

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पक्षाचे दत्ताजी मसूरकर इच्छूक होते. त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी मसूरकर यांना डावलून तटकरे यांनी त्यांचा मुलगा अनिकेतला उमेदवारी मिळवून दिली. तटकरे लोकसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून मुलगी आदितीला निवडून आणले. सद्यस्थितीत सुनील तटकरे खासदार, मुलगी राज्यमंत्री आणि मुलगा आमदार अशी तीन पदे तटकरे यांच्या घरात आहेत.

loading image
go to top