बिबट्याचा बालकासह चौघांवर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

कौठेकमळेश्वर (ता. संगमनेर) शिवारात आज सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका चिमुकल्यासह चार जण गंभीर जखमी झाले.

तळेगाव दिघे (जि. नगर) - कौठेकमळेश्वर (ता. संगमनेर) शिवारात आज सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका चिमुकल्यासह चार जण गंभीर जखमी झाले. वन विभागाचा कर्मचारी जीव धोक्‍यात घालून पाठलाग करत असताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला दुपारी दोनच्या सुमारास जेरबंद केले.

कृष्णा वाल्मीक गायकवाड (वय अडीच वर्षे), संजय जगन भडांगे (वय ४०), वन कर्मचारी एकनाथ खंडू थेटे (वय ५५, रा. निमगाव  जाळी) व संजय बबन भुजबळ (वय ४५, निंबाळे) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. चौघांनाही घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कौठेकमळेश्वर येथील वाल्मीक गायकवाड यांचा अडीच वर्षांचा मुलगा कृष्णा सकाळी खेळत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मानेला चावा घेतल्याने तो जखमी झाला. त्याच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर जांभळीचा मळा येथे याच बिबट्याने संजय भडांगे यांच्यावर हल्ला केला. संजयने मदतीसाठी आरडाओरडा केला. तो ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेताच बिबट्याने पुन्हा धूम ठोकली. घटनास्थळी गेलेल्या एकनाथ खंडू थेटे (वय ५५) व संजय बबन भुजबळ (वय ४५) या दोन वन मजुरांवरही बिबट्याने हल्ला केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard attacks on four person