राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

‘राज्यात कोरोना रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पण, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस आवर्जून घ्या,’ असा सल्ला सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी दिला आहे.

राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता कमी

पुणे - ‘राज्यात कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पण, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस (Vaccine) आवर्जून घ्या,’ असा सल्ला सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी दिला आहे. राज्यात चांगले झालेले लसीकरण, लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपयांबद्दल झालेली जागृती आणि दोन वर्षांमध्ये ७८ लाख ७६ जणांना झालेला कोरोना संसर्ग, यामुळे कोरोनाची चौथी लाट (Fourth Wave) येण्याची शक्यता कमी झाल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तेथे गेल्या काही आठवड्यांमध्ये चार ते पाच पटीने नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट निर्माण होईल, अशी भीती नागरिकांमध्ये पसरत आहे. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना हा सल्ला दिला.

‘राज्याच्या कोणत्या भागात रुग्ण आढळत आहेत. तेथे ‘क्लस्टर’ आहे का, यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या राज्यात आढळणारा ओमिक्रॉनचा व्हेरियंट आहे. त्यामुळे विषाणूचा व्हेरियंट बदलला नाही, तर खूप मोठी लाट येण्याची शक्यता कमी आहे,’ असे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले. राज्यात लसीकरण चांगले झाले आहे. शिवाय या तीनपैकी कोणत्या न कोणत्या लाटेत बहुतांश रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिकार करण्याची शक्ती वाढल्याची माहिती इम्युनोलॉजिस्टने दिली.

राज्यामध्ये प्रत्येक आठवड्याला नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक आठवड्याचे निरीक्षण केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत नाही. मुंबईमध्ये काही अंशी रुग्णांची संख्या वाढली आहे. दोन आठवड्यांपूर्वी ३०० रुग्ण होते, ते आता ३९० झाले आहेत. राज्याच्या इतर भागांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढलेली नाही. मुंबईमध्ये आढळलेल्यांपैकी ९५ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही ठळक लक्षणे नाहीत, तर राज्यभरात केवळ २० रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग

Web Title: Less Likely For The Fourth Wave Of The Corona In Maharashtra State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirusmaharashtra
go to top