महाराष्ट्रातील 'या' गावात नागपंचमीला केली जाते जिवंत नागाची पूजा ...

सुस्मिता वडतिले 
Saturday, 25 July 2020

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील नागोबाचे शेटफळ हे गाव. सोलापूर- अहमदनगर रोडवरील जेऊर गावापासून पाच किमी अंतरावर तीन हजार लोकसंख्यानी वसलेलं हे गाव आहे. येथे हजारोंच्या संख्येने अतिविषारी समजले जाणारे  नाग आहेत. या गावात ५०-६० लाकडी घरातून या नागांना विश्रांती घेण्यासाठी कांही जागा सोडली गेली आहे.

पुणे : आपण लहान असल्यापासून नागोबा हा शब्द ऐकलं असेलच, याचे नावच ऐकून मनात भीती निर्माण होते ते साहजिकच आहे. आजही काहीजण याला प्रत्यक्ष न पाहताही त्याचे फक्त नाव जरी घेतलं आणि त्याला टिव्ही किंवा फोटोमध्ये पाहिलं तरी घाबरून जातात, बरोबर आहे ना... पण महाराष्ट्रातील या गावात लहानापासून ते मोठ्यापर्यंत नागोबाला कुणीही घाबरत नाही. आणि या नागोबाला कुणीही त्रास देत नाही. चला तर मग  महाराष्ट्रातील 'नागोबाचे गाव' म्हणून ओळख असलेल्या 'या' गावाची महती जाणून घेऊयात.
     
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील नागोबाचे शेटफळ हे गाव. सोलापूर- अहमदनगर रोडवरील जेऊर गावापासून पाच किमी अंतरावर तीन हजार लोकसंख्यानी वसलेलं हे गाव आहे. येथे हजारोंच्या संख्येने अतिविषारी समजले जाणारे  नाग आहेत. या गावात ५०-६० लाकडी घरातून या नागांना विश्रांती घेण्यासाठी कांही जागा सोडली गेली आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत या गावात फक्त एकच सर्पदंशामुळे मृत्यू झालेला आहे.

शेटफळ या गावाचं वैशिष्ट्य हे आहे कि, येथील प्रत्येक घर, घरातली प्रत्येक माणूस हा सर्प मित्र आहे. इतकच नव्हे तर, काही  घरात नागोबा येऊन मुक्काम करण्यासाठी एक जागा आहे. हि या गावातील परंपरा आहे. या गावात साप मुक्त विहार करतात. या गावात पाच ते सात फुट लांबीचे नागोबा दृष्टीस पडतात पण गावातील लोकांना सापांची भीती वाटत नाही. या गावात नागोबाला कधीच मारलं जात नाही. त्यामुळे या गावातील नागोबांचे आयुष्य वाढते. 

नागोबाचे शेटफळ हे गाव जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करणारे गाव म्हणून या गावाची ओळख आहे . या गावाचे नागनाथ हे  ग्रामदैवत आहे. या गावाच्या शिवारामध्ये अस्सल कोब्रा जातीच्या नागांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दररोज अनेक ठिकाणी गावातील लोकांना नाग दिसतात. परिसरात नागोबांचा मुक्तपणे वावर असतो. परंतु या ठिकाणी दिसणाऱ्या नागांना कधीही मारले जात नाही, त्यांची पूजा केली जाते. गावात घरात निघालेल्या नागांना छोट्या काठीवर घेऊन गावाच्या बाहेरील मंदीराजवळील  मोकळ्या जागेत सोडले जाते. नागोबा हे या गावाची अपार श्रद्धा असून येथे नाग हे गावातील एक सदस्य प्रमाणेच असतात. एखाद्या पाळीव प्राण्याला ज्याप्रमाणे जीव लावल्यानंतर तो हिंस्त्र असला तरी त्याच्यापासून कोणताही धोका होत नाही. त्याचप्रमाणे या गावात नागोबाला अभय असल्यामुळे त्याच्याकडूनही गावातील नागरिकांना त्रास होत नाही. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष व्ही.आर. गायकवाड म्हणाले, मी प्रत्यक्ष शेटफळ गावात जावून आलो आहे. त्या गावातील नागोबा बद्दलची लोकांमध्ये असलेली श्रद्धा स्वतः पाहिलेली आहे. परंतु नवीन पिढी अंधश्रध्देपुढे मुक्त आहे. त्या गावातील लोक नागोबाला देव समजत असतील तर त्यात काय वावग नाही, ती चांगली गोष्ट आहे.  शेतकऱ्याचा मित्र म्हणून सापला ओळखलं जात. सापाला पकडणे, त्याला उचलणे या संदर्भात नवीन पिढीला प्रक्षिक्षण दिलं पाहिजे. जेणेकरून त्यांच्यात ही भीती राहणार नाही.

पत्रकार गजेंद्र पोळ म्हणाले, शेटफळ हे गाव नागोबाचे गाव म्हणून ओळखले जाते. आजच्या विज्ञान युगातही अनेक संकल्पना बदलेल्या आहेत. या काळात देवाचे दर्शन होते का असे अनेकांना वाटतं. परंतु आजही आम्हाला आमच्या गावात देवाचे दर्शन मिळते. या गावात नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जाते. त्यामुळे या गावाचे हे वेगळे वैशिष्ट्य आहे. नागोबाला त्रास देण्यासारखं गावकरी तसे काहीच वागत नाही. नागोबा हे या गावाची अपार श्रद्धा असून येथे नाग हे गावातील एक सदस्य प्रमाणेच आहेत. 

अशी आहे गावाची ओळख ... 

आजच्या विज्ञान युगामध्ये हे अनोखे वैशिष्ट्य लिहून ठेवणारं अस हे आगळंवेगळं गाव म्हणून या गावाची सर्वत्र ओळख आहे. नागनाथ देवस्थानावरून या गावाला नागोबाचे शेटफळ गाव अशी ओळख मिळाली आहे. आजही गावकरी लोक आपलं कोणतं गाव विचारलं तर 'नागोबाचे शेटफळ गाव' अशी ओळख सांगतात. 

नागोबाचे भव्य मंदिर... 

या गावात प्राचीन हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले नागोबाचे भव्य मंदिर आहे. समोर मंदिराचा गाभारा व आजूबाजूला दगडी भिंतीची तटबंदी आहे. मंदिराच्या पाठीमागे असणारा पुष्ककर्णी तीर्थकुंड भव्यतेची जाणीव करून देते. या गावात जीवंत नागाची पूजा केली जाते. या वैशिष्ट्यामुळे वर्षभर या गावाला भेट देणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. 

गावात पूर्वी असे केले जायचे... 

पूर्वीपासून जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या या गावात पूर्वी नवीन घर बांधताना लाकडाचे माळवाडामध्ये नागोबांना खेळण्यासाठी जागा सोडली जात असे. दोन्ही लाकडांमधून पोकळी ठेवली जात असे. म्हणेजच गावकरी आपल्या घरात नागोबासाठी खास जागा राखून ठेवत. जेणेकरून नागोबाला आत-बाहेर ये जा करता यायला हवे. लाकडाच्या मधल्या पोकळीमधून नागोबा घराबाहेर जात असत. 

आणि गावामध्ये आता... 

या गावात सध्या ५०-६० लाकडी जुनी घरे आहेत. त्या घरात नागोबा जाऊन बसतात. परंतु आता काही अंतर ठेवून नवीन घरे बांधल्यामुळे नागोबांना गावातील पडलेली रिकामी घरे, मोकळी जागा, झाडाझुडपामध्ये जागा मिळत असल्यामुळे त्यांना आता त्या लाकडी घरातल्या जागेची गरज राहिली नाही.   

गावात नागपंचमी अशी साजरी केली जाते... 

नागपंचमी दिवशी या गावात हमखास नागोबाचे दर्शन लोकांना होते. देव आपल्याला दर्शन देतो, यामुळे गावकऱ्यांना मनापासून खूप समाधान वाटते. नागपंचमी दिवशी निघालेल्या नागोबाला गावातील पटांगणामध्ये ठेवून त्याच्या भोवती गावातील स्त्रिया गोलाकार करून नागपंचमीची गाणी म्हणतात. त्यामुळे या दिवशी या गावाला नाग दर्शनासाठी अनेक लोक गर्दी करतात. नागोबाने दुधाला स्पर्श केला तर गावातील महिला याला शुभ मानतात. 

नागोबा येथे करतात विश्रांती... 

गावातील नागोबा हे कुणालाही त्रास देत नाहीत. गावातील लाकडी घरात, शेत, माळरानात, याठिकाणी नागोबा विश्रांती करतात. गावात दिवस रात्र कधीही फिरत असतात. 

यामुळे नवीन घरात नागोबांसाठी जागा ठेवली जात नाही... 

पूर्वी गावात लाकडाची घरे होती. पण आता गावामध्ये काही लोक नवीन घर बांधणी करत आहे. त्यात आता या गावात लग्न करून येणारी नवरी मुलगी घरात नागोबाला ठेवलेलं पाहून घाबरेल आणि तिच्या मनात भीती निर्माण होईल, म्हणून काही ठिकाणी नागोबांसाठी जागा ठेवणे बंद केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The living Nagoba is worshiped on the day of Nagpanchami in the village of Shetfal