मोठी बातमी! बॅंका म्हणाल्या...सरकारी आदेशानुसार नव्हे, तर 'आरबीआय'च्या निकषांनुसारच कर्जवाटप 

तात्या लांडगे
Friday, 26 June 2020

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जवाटप

राज्यातील 44 लाख 74 हजार शेतकऱ्यांना खरीपात कर्जवाटप करावे, असे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने बॅंकांना उद्दिष्टे दिले आहे. मात्र, शेती व बिगरशेती कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, नागपूर, वर्धा, बुलढाणा, बीड, नांदेड, जालना, यवतमाळ या जिल्हा बॅंकांकडून नव्या सभासदांना कर्जवाटप केले जात नाही. तर दुसरीकडे सरकारी आदेशानुसार नव्हे, तर रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जवाटप करणे बंधनकारक असल्याचे विविध बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

सोलापूर : राज्यातील 44 लाख 74 हजार शेतकऱ्यांना खरीपात कर्जवाटप करावे, असे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने बॅंकांना उद्दिष्टे दिले आहे. मात्र, शेती व बिगरशेती कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, नागपूर, वर्धा, बुलढाणा, बीड, नांदेड, जालना, यवतमाळ या जिल्हा बॅंकांकडून नव्या सभासदांना कर्जवाटप केले जात नाही. तर दुसरीकडे सरकारी आदेशानुसार नव्हे, तर रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जवाटप करणे बंधनकारक असल्याचे विविध बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाउनमुळे राज्यातील 18 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नाही. तर नियमित कर्जदारांना 50 हजारांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षच आहे. नियमित कर्जाची परतफेड करुनही सरकारकडून काहीच मिळाले नसून कर्ज थकविलेल्यांना मात्र, दीड-दोन लाखांची माफी मिळाली. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 44 लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांपैकी 30 लाखांहून अधिक कर्जदार नव्याने थकबाकीत गेल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे किसान क्रेडिट कार्ड असतानाही थकबाकीमुळे सुमारे 21 लाख शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येत नसल्याचे चित्र आहे. तर थकबाकीमुळे बहूतांश शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी बॅंकांकडे फिरकलेच नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले. 

सरकारी आदेशानुसार नव्हे, तर 'आरबीआय'च्या निकषांनुसारच कर्जवाटप
राज्यातील जे शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, परंतु त्यांना लॉकडाउनमुळे लाभ मिळालेला नाही, त्यांना बॅंकांनी कर्जवाटप करावे, अशा सूचना सरकारने बॅंकांना दिल्या. सदर रक्‍कम सरकारकडे येणेबाकी दाखवावी, असेही स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या आदेशानुसार बॅंका चालत नाहीत. तर रिझर्व्ह बॅंकेच्या निकषानुसार नियमित कर्जदारांनाच नवे कर्जवाटप करता येते, अशी भूमिका बॅंकांनी घेतली आहे. 

राज्यातील खरीप कर्जवाटपाची स्थिती 
जिल्हा बॅंका 
29 
खरीप हंगामातील शेतकरी 
44.74 लाख 
कर्जवाटपाचे उद्दिष्टे 
13,305 कोटी 
नव्या सभासदांना कर्ज न देणाऱ्या जिल्हा बॅंका 
10 

कोल्हापूर जिल्हा बॅंक कर्जवाटपात राज्यात अव्वल 
राज्यातील 29 जिल्हा बॅंकांना राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने खरीप हंमागासाठी 13 हजार 305 कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्टे दिले. त्यानुसार राज्यातील 44 लाख 74 हजार शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा बॅंकेला 686 कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्टे असून या बॅंकेने आतापर्यंत उद्दिष्टाच्या तब्बल 174 टक्‍के कर्जवाटप केल्याची माहिती विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडकर यांनी दिली. त्यापाठोपाठ पुणे, सोलापूर, सांगली या बॅंकांचा क्रमांक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan allocation not as per government order but as per RBI norms