संसर्ग वाढल्यास पुन्हा लॉकडाउन - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

विठ्ठल दर्शन घेणार
आत्तापर्यंत राज्य सरकारला ज्या प्रकारे सहकार्य दिले तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. वारीचा सोहळा या वेळी नाइलाज म्हणून, संयम दाखवत साजरा केला जात असताना वारकऱ्यांचा, राज्यातील विठ्ठलभक्तांचा प्रतिनिधी म्हणून आपण आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही व त्याच्या चरणी कोरोनामुक्त राज्याचे साकडे घालणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई - ‘आर्थिक चक्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू केले असले, तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही. गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा. महाराष्ट्र हा औषधोपचार आणि सुविधा देण्यात कुठेही मागे नसून, कोरोनामुक्त झालेल्यांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संसर्ग वाढताना दिसला, तर नाइलाज म्हणून काही भागांत पुन्हा लॉकडाउन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. एक जुलै रोजी येणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, हा दिवस माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस असून, हा सप्ताह शेतकरी सप्ताह म्हणून साजरा केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची संततधार

कर्जमुक्त करणार
कर्जमुक्तीच्या योजनेची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी निवडणुकीची आचारसंहिता आल्याने आणि नंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देता आला नाही; ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दहीहंडी मंडळांचे आभार
कोणतीही चर्चा न करता स्वतःहून सामाजिक भान राखत दहीहंडीचा उत्सव रद्द करणाऱ्या मंडळांचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आभार मानले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बोगस बियाण्यांबाबत कारवाई होणार
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘बोगस बियाण्यांच्या तक्रारी ग्रामीण भागातून काही प्रमाणात प्राप्त होत आहेत; त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसूल केली जाईल.’’

प्लाझ्मा दान करा
कोरोना रुग्णावरील उपचारांना आपण कुठेही कमी पडत नसल्याचे सांगताना, जी जी औषधे यासाठी सुचवली जात आहेत, ती उपलब्ध करून घेऊन रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘‘प्लाझ्मा थेरपीची सुरुवात महाराष्ट्रात मार्च-एप्रिलपासून झाली. १० पैकी ९ रुग्ण यामुळे बरे झाले, तर ७ जण घरीही गेले. प्लाझ्मा थेरपी करणारे देशातील सर्वांत मोठे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी, अँटिबॉडीज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा,’’ असे आवाहन त्यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्येष्ठ डॉक्टरांना आवाहन
महाराष्ट्राला तुमच्या अनुभवाची गरज असल्याचे आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ डॉक्टरांना पुढे येऊन रुग्णसेवा देण्याचे आवाहन केले. ‘चेस द व्हायरस’ ही संकल्पना मुंबईप्रमाणे राज्यात सुरू केल्याचे व औषधोपचार, चाचण्या वाढविण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांचा विश्‍वास
गुंतवणूकदारांना महाराष्ट्र आपला वाटतो, ही गोष्ट खूप महत्त्वाची असून, गेल्या आठवड्यात १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार विविध कंपन्यांसोबत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यामध्ये भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असून, त्यादृष्टीने गुंतवणूकदारांना सोयीसुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

भ्रमात राहू नका
शाळा सुरू होण्यापेक्षा शिक्षण सुरू होण्याला सध्याच्या परिस्थितीत महत्त्व दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ३० जूनला लॉकडाउन संपणार आणि सगळेच व्यवहार पुन्हा सुरू होणार, या भ्रमात न राहण्याचेही ते म्हणाले.

विठ्ठल दर्शन घेणार
आत्तापर्यंत राज्य सरकारला ज्या प्रकारे सहकार्य दिले तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. वारीचा सोहळा या वेळी नाइलाज म्हणून, संयम दाखवत साजरा केला जात असताना वारकऱ्यांचा, राज्यातील विठ्ठलभक्तांचा प्रतिनिधी म्हणून आपण आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही व त्याच्या चरणी कोरोनामुक्त राज्याचे साकडे घालणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown again if infection increases Uddhav Thackeray