esakal | सोलापुरात होणार लॉकडाऊन, नियमावली व तारखांची घोषणा उद्या 
sakal

बोलून बातमी शोधा

bharne mama

पहिल्या टप्प्यात शहरासाठी लॉकडाऊन 
लॉकडाऊनच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी किमान पाच दिवस आगोदर सर्वसामान्यांना त्या बाबतच्या सूचना दिल्या जाणार आहेत. या कालावधीत त्यांनी जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करुन घ्यावी. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन हा सोलापूर शहरापुरता असणार आहे. 
- दत्तात्रेय भरणे, पालकमंत्री, सोलापूर 

सोलापुरात होणार लॉकडाऊन, नियमावली व तारखांची घोषणा उद्या 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहा दिवसांचा लॉकडाऊन घ्यावा अशी भूमिका महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी घेतली. लॉकडाऊन कालावधीतील नियमावली व लॉकडाऊनच्या तारखांची घोषणा उद्या (शनिवार, ता. 11) दुपारी होणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापूरच्या लॉकडाऊन कालावधीत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी काय उपाय योजना असाव्यात, लॉकडाऊन कालावधीत कोणाला व कोणत्या बाबींना सवलत असणार? याबाबतची नियमावली करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक उद्या (शनिवार) दुपारी होणार आहे. ही बैठक झाल्यानंतर याबाबतची घोषणा केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली. सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी सोलापुरातील लॉकडाऊनबाबत आज सात रस्ता येथील नियोजन भवनात बैठक घेतली. या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचन यन्नम, विरोधी पक्षनेते महेश कोठे, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे यांच्यासह विविध पक्षाचे गटनेते व अधिकारी उपस्थित होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोलापुरात लॉकडाऊन घ्यावाच असा एकमुखी निर्णय झाला. लॉकडाऊन करताना सोलापुरातील मजूर, कामगार व हातावरचे पोट असणाऱ्या व्यक्तींची उपासमार होणार नाही? याचीही काळजी घेण्याची मागणी पालकमंत्री भरणे यांच्याकडे करण्यात आली आहे.