#कल_महाराष्ट्राचा : मोदींची आघाडी; पण वाट बिकट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

पंतप्रधानपदासाठी आपली पसंती खालीलपैकी कोणाला (कंसात सरासरी) 
नरेंद्र मोदी (35)
राहुल गांधी (28)
शरद पवार (31)
ममता बॅनर्जी (02)
मायावती (02)
केजरीवाल (02)
मुलायमसिंह (00)
चंद्राबाबू (00)

‘सकाळ’ गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनाचा सातत्याने कानोसा घेत आहे. लोकसभेची आगामी निवडणूक, पाठोपाठ होऊ घातलेली विधानसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष...

महाराष्ट्रात अटीतटीची लढत
भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला अधिक पसंती
मतदारसंघात बदल होण्याच्या बाजूने कौल

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ४२ जागा जिंकणारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी, विशेषत: भारतीय जनता पक्ष, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी येणारी लोकसभा निवडणूक ही नेतृत्व व लोकप्रियतेचा कस पाहणारी असेल, असे ‘सकाळ’च्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. पाच वर्षांपूर्वी मोदींच्या प्रभावाखाली असलेल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदारांना भाजप आघाडी पुन्हा सत्तेवर येणार नाही, असे वाटते. गेल्या वेळेप्रमाणे मोदींची जादू चालणार नाही, असे वाटणाऱ्यांचे प्रमाणही तुलनेने सर्वाधिक आहे.

या सर्वेक्षणात केंद्र तसेच राज्य सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन, विविध राजकीय पक्षांना असणारी पसंती, पंतप्रधान कोण असावेत याचा पसंतीक्रम, त्याचप्रमाणे खासदार व आमदारांच्या कामांचे मूल्यमापन करणारे आणि राफेल व्यवहार, पाच राज्यांमधील निकालाचे परिणाम आदींबाबत मतदारांना काय वाटते हे जाणून घेतले.

या सर्वेक्षणामधील एक ठळक निष्कर्ष हा की राज्यातील मतदारांचा पसंतीक्रम भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असा आतापर्यंतच्या ‘सकाळ’च्या सर्वेक्षणाशी सुसंगत असला तरी भारतीय जनता पक्षाला मत द्यायचे नसल्यास कोणाला देणार, या प्रश्‍नाच्या उत्तरात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे सरासरी ४५ टक्‍के पसंती आहे. काँग्रेस हा क्रमांक दोनचा पर्याय आहे. शहरी मतदारांच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्रात, त्यातही शेतकऱ्यांमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा अधिक पसंती आहे. एकीकडे मोदींच्या नेतृत्वात भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी नाही, असे म्हणणारे राज्यातील मतदार भाजपविरोधातील महाआघाडी मात्र विश्‍वासार्ह नाही, असे म्हणतात. सर्वाधिक ३७ टक्‍के मतदारांना महाआघाडी विश्‍वासार्ह वाटत नाही.

पंतप्रधानपदासाठी आपली पसंती खालीलपैकी कोणाला (कंसात सरासरी) 
नरेंद्र मोदी (35)
राहुल गांधी (28)
शरद पवार (31)
ममता बॅनर्जी (02)
मायावती (02)
केजरीवाल (02)
मुलायमसिंह (00)
चंद्राबाबू (00)

फडणवीस सरकारची सर्वात उल्लेखनीय कामगिरी कोणती? (कंसात सरासरी)
जलयुक्त शिवार (30)
मराठा आऱक्षण (25)
शेतकरी कर्जमाफी (16)
मेक इन महाराष्ट्र (10)
सेवा हमी कायदा (05)
मुंबईसह अन्य शहरांमधले मेट्रो प्रकल्प (08)
शहरी भागांसाठी परवडणाऱ्या घरांचे धोरण (06)

लोकसभा निवडणुकीत तुमच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे मुद्दे कोणते?
१. महागाई व भाववाढ
२. शेतीचे प्रश्न
३. बेरोजगारी
४. भ्रष्टाचार व गैरव्यवहार
५. जातीयवाद
६. पायाभूत विकास
७. कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षितता
८. स्थानिक प्रश्न

आपल्या मतदारसंघात बदल व्हावा किंवा नाही याबद्दल काय वाटते? (कंसात सरासरी)
विद्यमान खासदारच पुन्हा निवडून यावेत (26)
विद्यमान पक्षाचाच, पण दुसरा उमेदवार निवडून यावा (24)
विद्यमान पक्ष आणि खासदार दोन्ही बदलावेत (37)
सांगता येत नाही (13)

सातत्याने सर्वेक्षण
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांत हे सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणात विधानसभा मतदारसंघांतील स्त्री-पुरुष, शहरी-ग्रामीण, शिक्षण, व्यवसाय आणि वयोगट अशा प्रमुख निकषांप्रमाणे असणाऱ्या मतदार संख्येच्या रचनेचे प्रतिबिंब पडेल याची काळजी घेण्यात आली आहे. 
(*सर्व आकडे टक्क्यांत, अपूर्णांकातील संख्या जवळच्या पूर्णांकामध्ये रूपांतरित करण्यात आली आहे.)

भाजपविरोधातील आघाडी विश्वासार्ह वाटते काय? (कंसात सरासरी)
होय (32)
नाही (37)
सांगता येत नाही (31)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Election Narendra Modi Politics BJP Shivsena NCP Congress