LokSabha 2019 : विदर्भात बहुरंगी लढतींची शक्‍यता कमीच 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मार्च 2019

नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भाजप-सेनेला शह देण्याचा प्रयत्न करीत असली तरी अंतर्गत हाणामारी व विस्कळीत संघटन यामुळे आघाडी युतीवर कितपत भारी पडेल, याबाबत शंकाच आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर प्रणित भारिप-बहुजन-वंचित आघाडीही आपली शक्ती दाखविण्याचा प्रयत्न करेल.

नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भाजप-सेनेला शह देण्याचा प्रयत्न करीत असली तरी अंतर्गत हाणामारी व विस्कळीत संघटन यामुळे आघाडी युतीवर कितपत भारी पडेल, याबाबत शंकाच आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर प्रणित भारिप-बहुजन-वंचित आघाडीही आपली शक्ती दाखविण्याचा प्रयत्न करेल. तरीही अमरावती, अकोल्यासारख्या एखाद-दुसऱ्या मतदारसंघात तिरंगी वा बहुरंगी लढत होईल. उर्वरित ठिकाणी थेट लढतीचीच शक्‍यता अधिक आहे. 

नागपूर : या मतदारसंघात विद्यमान खासदार नितीन गडकरी आणि भाजपाची निवडणुकीसाठी गेले दोन वर्षांपासूनच तयारी सुरू होती. गडकरी यांनी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवातून आपली प्रचाराची एक फेरी आटोपलीही आहे. आठवडाभरापासून गडकरी आणि मुख्यमंत्री यांनी उद्‌घाटन, लोकार्पण, भूमिपूजनांचे कार्यक्रम आटोपून घेतले. विधानसभानिहाय मेळावेही पार पडले. दुसरीकडे कॉंग्रेसचा उमेदवारच ठरलेला नाही. नाना पटोलेंचे नाव घेतले जात असले तरी, ते नागपूरचे नाही व त्यांचा म्हणावा असा गटही शहरात नाही. त्यामुळे गडकरींच्या आधी त्यांना आपल्या लोकांशीच लढावे लागणार आहे.

रामटेक : रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. दुसरीकडे कॉंग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुकुल वासनिक किंवा नितीन राऊत यांच्यापैकी एकाला किंवा मुकुल वासनिकांच्या विश्‍वासातील व्यक्तीला उमेदवारी मिळू शकते, असेही जाणकारांचे मत आहे. याशिवाय बसप, भाकपचेही उमेदवारही लोकसभा निवडणुकीत रंगत आणू शकतात. तुमाने यांनी निवडणुकीपूर्वीच मतदारसंघाचा पूर्ण दौरा करून प्रचाराचा बिगुल फुंकला आहे. सध्यातरी कॉंग्रेस या आघाडीवर पिछाडीवर आहे. 

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ परत एकदा रिंगणात असून युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा, दिनेश बूब, गुणवंत देवपारे, डॉ. राजेंद्र गवई हेसुद्धा मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे यंदा अमरावतीत बहुरंगी टक्कर होण्याची शक्‍यता आहे. देवपारे हे वंचित आघाडीचे उमेदवार असून दिनेश बूब यांचे नाव राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून चर्चेत असले तरी ते नाव अद्याप जाहीर झालेले नाही. नवनीत राणा युवा स्वाभिमानच्या बॅनरखाली लढतात की कोणत्या पक्षाचे तिकीट घेतात याबाबतचा संभ्रम कायम आहे. डॉ. राजेंद्र गवई रिपाइंच्या बॅनरखाली लढणार आहेत. 

यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने जोरात सुरू केले असले तरी, हा मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे. कॉंग्रेस उमेदवारीच्या शर्यतीत माणिकराव ठाकरे यांचे पारडे जड असले तरी शिवाजीराव मोघे, जीवन पाटील यांचे पक्षांतर्गत आव्हान त्यांच्यासमोर आहेच. वंचित बहुजन आघाडीने प्रा. प्रवीण पवार यांना उमेदवारी जाहीर करून लढतीत रोमांच निर्माण केला आहे. 

वर्धा : एकेकाळी कॉंग्रेसचा गड म्हणून ओळखला जाणाऱ्या वर्धा मतदारसंघाने भाजपला तीनदा निवडून दिले आहे. माकपचे रामचंद्र घंगारेही येथून एकदा खासदार राहिले आहेत. सध्या भाजपचे रामदास तडस हे खासदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सध्या भाजप, कॉंग्रेसची उमेदवारी कुणाला मिळते, याकडेच मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. वर्धा जिल्हा व अमरावती जिल्ह्यातील चार तालुक्‍यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसपुढे गतवैभव प्राप्त करण्याचे आव्हान आहे. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराने गेल्या काही निवडणुकांपासून तिसरे स्थान मिळविले आहे. मतदारसंघात जातीचे कार्डही वेळोवेळी खेळले जाते. 

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मागील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे नाना पटोले निवडून आले होते. मात्र, वर्षभरापूर्वी ते कॉंग्रेसमध्ये गेले व त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे येथून विजयी झालेत. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल, मधुकर कुकडे हे दावेदार आहेत. तसेच भाजपकडून डॉ. परिणय फुके, सुनील मेंढे, हेमंत पटले, रमेश कुथे, डॉ. खुशाल बोपचे यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय बसप, विदर्भवादी पार्टी, भारिप-बहुजन महासंघ आणि अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात राहू शकतात. या मतदारसंघात कुणबी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक असून, पवार, माळी, ढिवर, अनुसूचित जाती, तेली, कोहळी या समाजाची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर संबंधित समाजाला प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्‍यता दिसते. 

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्र तसा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, मागील चार निवडणुकीत भाजपचे हंसराज अहीर हे येथून निवडून येत आहे. अहीर यांच्या विजयात कॉंग्रेसच्या पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी भाजपचे उमेदवार म्हणून हंसराज अहीर यांनी जनसंपर्क सुरू केला होता. तर, दुसरीकडे कॉंग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. परंतु, अजूनही कॉंग्रेसकडून कोणता उमेदवार मैदानात राहील, हे गुलदस्त्यात आहे. वंचित बहुजन आघाडीने एक महिन्याअगोदर ऍड. राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

गडचिरोली : चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्रात भाजपचा उमेदवार वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडून उमेदवार निश्‍चित झालेला नाही. कॉंग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. किरसान, मारोतराव कोवासे व डॉ. विनायक कोडवते यांची नावे चर्चेत असून ते चौघेही गेल्या आठवडाभरापासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. चारपैकी उमेदवारी कुणालाही मिळाली तरी पक्षातील अंतर्गत कलह त्याच्यासाठी डोकेदुखी ठरेल, हे नक्की. भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले असून भारिप बहुजन महासंघाकडून डॉ. रमेश गजबे यांच्या नावाची चर्चा आहे.

अकोला, बुलडाणा : या दोन्ही मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये फारसा बदल दिसत नाही. जवळपास गेल्या लोकसभा निवडणुकी प्रमाणेच वातावरण आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मतविभाजनाचा फटका बसण्याचा धोका आहे. अकोल्यातील विद्यमान भाजप खासदार संजय धोत्रे व बुलडाण्यातील शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. बुलडाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे उमेदवार असतील. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने प्रकाश आंबेडकर यावेळीही मैदानात उतरतील. येथे कॉंग्रेस कोणता उमेदवार देते याकडे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LokSabha 2019 nothing major change in Vidarbha political situation