esakal | Loksabha 2019 : बालेकिल्ल्यात पवारांना घेरण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्‍न

  • बऱ्याच तालुक्‍यातील पाणीटंचाई
  • शहरी भागात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न
  • अनेक ठिकाणी रस्त्यांची रखडलेली कामे
  • ग्रामीण व शहरी मतदार असल्याने दोन्ही भागांचे अनेक प्रश्‍न
  • बेरोजगारीचा वाढलेला टक्का 

Loksabha 2019 : बालेकिल्ल्यात पवारांना घेरण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
मिलिंद संगई

गत निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे घटलेले मताधिक्‍य आणि त्यांच्या विरोधकांना मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्यासमोर कडवे आव्हान ठेवण्याचा प्रयत्न भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी देऊन केला आहे. सभांमागे सभा हे त्यांचे सूत्र आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने यंदा कधी नव्हे इतका जोर लावल्याने ही लढत देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढतींपैकी एक ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना रिंगणात उतरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अनिश्‍चित असली तरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ यांना बारामतीच्या रणांगणात भाजपने उतरवले आहे. भाजपने प्रथमच ही लढत प्रतिष्ठेची केली आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीची जबाबदारी स्वतःवर घेत पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा चंग बांधलाय, ते मतदारसंघातच तळ ठोकून आहेत. दुसरीकडे शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने निवडणूक जिंकण्यासाठी नेहमीसारखी रणनीती आखलेली आहे. पवारांना बारामतीतच अडकवून ठेवण्याची नेहमीची व्यूहरचना यात आहे. गतवेळी सुळे यांचे मताधिक्‍य घटले होते. त्याचे भांडवल करण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न दिसतोय.
पवार कुटुंबीयांना लक्ष्य करत त्यांच्यावर प्रहार करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केल्याचे दिसते. मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तसेच भोर हा परिसर ग्रामीण, तर खडकवासल्याचा परिसर शहरी आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील मतदारांनाही आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडून होतो आहे. दुसरीकडे वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने नवनाथ पडळकर हेही रिंगणात आहेत.

मतदारसंघात उमेदवारांची संख्या विचारात घेता मतांची किती विभागणी होणार या बाबत कमालीची उत्सुकता आहे. 

केवळ राष्ट्रीय पातळीवरीलच नाही तर राज्य स्तरावरील पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, महादेव जानकर, पाशा पटेल यांच्याही सभा बारामतीत होणार आहेत.

loading image
go to top