Loksabha 2019 : बदलाच्या शक्यतेने अंबानी काँग्रेसमागे : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

देशातील सध्याचे वातावरण आणि दोन वर्षांत झालेल्या अन्य राज्यांतील निवडणुकांचे निकाल पाहता नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, याचा अंदाज आल्याने उद्धव ठाकरे यांचे मित्र मुकेश अंबानींनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्‍त केले.

मुंबई - देशातील सध्याचे वातावरण आणि दोन वर्षांत झालेल्या अन्य राज्यांतील निवडणुकांचे निकाल पाहता नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, याचा अंदाज आल्याने उद्धव ठाकरे यांचे मित्र मुकेश अंबानींनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्‍त केले; तसेच नोटाबंदीची चौकशी केल्यास देशातील सर्वांत मोठा गैरव्यवहार बाहेर येईल, असा गौप्यस्फोटही या वेळी राज यांनी केला. काळाचौकी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

‘देशाच्या इतिहासात कोणत्याही उद्योगपतीने निवडणुकीत राजकीय पक्षाला पाठिंबा दिल्याची घटना घडली नाही. मुकेश अंबानी यांना काँग्रेसला पाठिंबाच द्यायचा होता तर त्यांनी गुपचूप मतदान केले असते. मात्र त्यांनी जाहीरपणे मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला. त्यांच्या भूमिकेचे उद्योगपती उदय कोटक यांनीही स्वागत केले. यावरून हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, हे लक्षात आल्यानेच त्यांनी मोदी यांच्याकडे पाठ फिरवली,’’ असे राज यांनी म्हटले आहे.

राज म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकशाही वाचवण्याचे आवाहन करतात. न्या. लोया यांचा खून होतो. या खुनाच्या संशयाची सुई अमित शहा यांच्याकडे जाते. मोदी, शाह यांच्याविरोधात बोलणाऱ्यांवर तपास यंत्रणांचे छापे घातले जातात. यावरून देशात कशी हुकूमशाही आहे, ते लक्षात येते.’’

‘सरकार चुकीचे वागले म्हणून २०१४ पूर्वी मी काँग्रेस-राष्ट्रवादीची कातडी सोलली, आता तुमचे पूर्ण कपडे उतरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’’ असा इशारा राज यांनी मुख्यमंत्री, भाजप नेत्यांना या वेळी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Mukesh Ambani in Congress Raj Thackeray Politics