Udayanraje-and-Shrinivas
Udayanraje-and-Shrinivas

Loksabha 2019 : सातारा : लोकसभेसाठी ‘काँटे की टक्कर’

रंगतदार वळणावरच्या विधानसभा निवडणुकीकडे जसे राज्याचे लक्ष आहे, तसेच ते सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडेही आहे. निवडणुकीतील विजयानंतर तीनच महिन्यांत खासदारकी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये जाऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उदयनराजे भोसलेंमुळे ही पोटनिवडणूक लक्षवेधी ठरली आहे. राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील त्यांना ‘काँटे की टक्कर’ देत आहेत.

सातारा जिल्हा मुळात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. २०१४ मधील नरेंद्र मोदी लाटेतही राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला शाबूत राहिला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या तिकिटावर उदयनराजे विजयी झाले. मागील पाच वर्षांत भाजपने जिल्ह्यात मोठी ताकद लावण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार ठरवून त्यांना सातत्याने ताकद दिली. कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यात विजयी शिरकाव करायचाच, असा चंग बांधलेल्या भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्यांना भाजपमध्ये घेऊन प्रत्यक्ष लढाईआधीच मोठी बाजी मारली.

या पार्श्‍वभूमीवरील ही पोटनिवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रवादीने माजी खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उदयनराजेंविरोधात उमेदवारी देऊन भाजपपुढे आणि पर्यायाने उदयनराजेंसमोर मोठे आव्हान उभे केले. ही पोटनिवडणूक विधानसभेसोबत झाल्यास आपला सहज विजय होऊ शकतो, ही उदयनराजेंची त्या वेळची अटकळ होती. मात्र ती किती तकलादू होती, हे पाटील यांना प्रचारात मिळत असलेल्या प्रतिसादावरून एव्हाना उदयनराजेंच्याही लक्षात आले असेल. छत्रपतींच्या घराण्यातील वारसदार म्हणून उदयनराजेंबाबत जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात आदराचे स्थान आहे. त्यांचे वलय आणि भाजपची साथ, या जोरावर ही निवडणूक सहज जिंकू, हा उदयनराजे समर्थकांचा दावा होता. मात्र, तीनच महिन्यांत राजीनामा का दिला, या प्रश्‍नाचे जनतेला पटेल असे उत्तर ते देऊ शकलेले नाहीत. म्हणूनच, उदयनराजेंना काही प्रमाणात नाराजीला तोंड द्यावे लागतेय. सोशल मीडियावरही ते कधी नव्हे इतके ट्रोल होताना दिसताहेत.

महायुतीतील दिग्गज नेत्यांच्या सभा या मतदारसंघात झाल्यात. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारसंघात प्रचार सभा घेऊन आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केले. शहा यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या आगपाखडीनंतर चव्हाण यांनीही ‘उदयनराजे दोन लाख मतांनी पराभूत होतील,’ असे भाकीत करून या वाक्‍युद्धात आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. मोदींनीही साताऱ्यातील सभेत शरद पवार यांना लक्ष्य केले. त्यामुळे या पोटनिवडणुकीला ‘मोदी विरुद्ध पवार’ असे स्वरूप आले. जिल्ह्यात अलीकडच्या काळात जसा मोदीप्रेमी वर्ग तयार झालाय, तसाच पवारांवर प्रेम करणारा आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा पगडा असलेला मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. त्यामुळेच ही लढत ‘उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील’ अशी न राहता जिल्ह्यात ‘मोदी की पवार’ हे ठरविणारी झाली आहे. सुरवातीला एकतर्फी वाटलेल्या या लढतीला चुरशीचे स्वरूप आलेय. उदयनराजेंकडून जोरदार प्रचार सुरू आहे. श्रीनिवास पाटील यांनीही मतदारसंघ पिंजून काढलाय. पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याचा आपला निर्णय योग्यच होता, हे उदयनराजे सिद्ध करून दाखविणार की श्रीनिवास पाटील तो चुकीचा ठरविणार, हे येत्या २४ तारखेला स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com