दोन वर्षांत राज्यातील 39 लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

मागील वर्षीचा दुष्काळ तर या वर्षीची अतिवृष्टी व पुरामुळे राज्यभरातील 39 लाख शेतकऱ्यांचे 27 लाख हेक्‍टरवरील पिकांचे 30 हजार 790 कोटींचे नुकसान झाले. सरकारच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मागील वर्षी सात हजार 100 कोटींची मदत मिळाली, तर यंदा अतिवृष्टी व पुरामुळे दोन हजार कोटींहून अधिक नुकसान होऊनही 501 कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला. 

सोलापूर - मागील वर्षीचा दुष्काळ तर या वर्षीची अतिवृष्टी व पुरामुळे राज्यभरातील 39 लाख शेतकऱ्यांचे 27 लाख हेक्‍टरवरील पिकांचे 30 हजार 790 कोटींचे नुकसान झाले. सरकारच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मागील वर्षी सात हजार 100 कोटींची मदत मिळाली, तर यंदा अतिवृष्टी व पुरामुळे दोन हजार कोटींहून अधिक नुकसान होऊनही 501 कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला. 

दुष्काळ, नापिकी, पूर, अतिवृष्टी, अवकाळी या नैसर्गिक आपत्ती तर खासगी सावकार अन्‌ बॅंकांच्या कर्जाचा डोक्‍यावरील डोंगर आणि त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह मुलांचे शिक्षण व विवाहाची चिंता यातून मार्ग निघत नसल्याने मागील पाच वर्षांत राज्यात 15 हजार 600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, नैसर्गिक आपत्तींमध्ये चारपट नुकसान होऊनही मदत एकपटच मिळाल्याने त्यांच्यावर उसनवारीची वेळ आली. आता मूग, उडीद, सोयाबीनच्या खरेदीसाठी सरकारने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली. मात्र, आतापर्यंत 100 शेतकऱ्यांनीही ऑनलाइन नोंदणी केलेली नाही. पेरणी करूनही पाण्याअभावी पीक उगवले नाही, तर काही ठिकाणी पूर व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पन्नात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निकषांनुसार त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून सात हजार कोटी रुपयांची मदत मिळाली. यंदा पूर व अतिवृष्टीमुळे 501 कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारला पाठविण्यात आला असून, केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. वास्तविक पाहता दुष्काळ, पूर व अतिवृष्टीमुळे चौपट नुकसान झाले असतानाही निकषांनुसार मदत दिली जात आहे. 
- हरी बाबटीवाले, उपसंचालक, कृषी 

राज्यातील नुकसान 
वर्ष दुष्काळामुळे बाधित क्षेत्र प्रत्यक्ष नुकसान सरकारची मदत (रुपयांत) 
2018- 19 18.59 लाख हेक्‍टर 28,600 कोटी 7,100 कोटी 
2019- 20 9.43 लाख हेक्‍टर 2,190 कोटी 501 कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of crop of 39 lakh farmers in the state in two years