मधुकर तोरडमल यांचा अल्प परिचय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

नाट्यसृष्टीच्या मामांची "एक्‍झिट' 

ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल हे नाट्यसृष्टीचे "मामा' म्हणून ओळखले जायचे. त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटकांतून विविध भूमिका केल्या. त्यांनीच लेखन, दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या "तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकात त्यांनी रंगविलेला इरसाल "प्रा. बारटक्के' आजही नाट्यरसिकांच्या लक्षात आहे. स्वत:च्याच "रसिकरंजन' नाट्यसंस्थेतर्फे त्यांनी या नाटकाचे अनेक प्रयोग केले. त्यानंतर अन्य नाट्य संस्थांतर्फेही हे नाटक रंगभूमीवर सादर झाले. दोन वर्षांपूर्वीच या नाटकाचा पाच हजारावा प्रयोग तोरडमल यांच्या उपस्थितीत सादर झाला होता. 

नाट्यसृष्टीच्या मामांची "एक्‍झिट' 

ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल हे नाट्यसृष्टीचे "मामा' म्हणून ओळखले जायचे. त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटकांतून विविध भूमिका केल्या. त्यांनीच लेखन, दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या "तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकात त्यांनी रंगविलेला इरसाल "प्रा. बारटक्के' आजही नाट्यरसिकांच्या लक्षात आहे. स्वत:च्याच "रसिकरंजन' नाट्यसंस्थेतर्फे त्यांनी या नाटकाचे अनेक प्रयोग केले. त्यानंतर अन्य नाट्य संस्थांतर्फेही हे नाटक रंगभूमीवर सादर झाले. दोन वर्षांपूर्वीच या नाटकाचा पाच हजारावा प्रयोग तोरडमल यांच्या उपस्थितीत सादर झाला होता. 

मामा तोरडमल यांच्या अभिनयाची सुरवात मुंबईतील शाळेतूनच झाली. ते 10 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या काकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईत आणले. शेठ आनंदीलाल पोद्दार ही त्यांची शाळा. शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना त्यांनी नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे सांगितले होते. शिक्षकांनी हेच लक्षात ठेवून गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच सोपविली होती. चिं. वि. जोशीलिखित "प्रतिज्ञापूर्ती' हे नाटक त्यांनी बसविले. त्यात त्यांनी अभिनयही केला. त्यानंतर शाळेचे स्नेहसंमेलन व अन्य कार्यक्रमांतून नाटक बसविण्याची जबाबदारी तोरडमलांकडे आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडलीत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कुर्ला येथे "प्रीमियर ऑटोमोबाइल' कंपनीत काही काळ लिपिक म्हणून व पुढे नगरला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काही काळ नोकरी केली. या काळात "भोवरा', "सैनिक नावाचा माणूस' ही नाटकेही त्यांनी केली. 

राज्य नाट्य स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. यात "एक होता म्हातारा' हे नाटक गाजले होते. त्यांनी साकारलेल्या "बळीमामा' या भूमिकेमुळे त्यांना "मामा' ही बिरुदावली मिळाली. पुढे सगळेजण त्यांना "मामा' म्हणायला लागले आणि अवघ्या मराठी नाट्यसृष्टीचे ते "मामा' झाले. राज्य नाट्य स्पर्धेतून नाव झाल्यामुळे व्यावसायिक रंगभूमीतर्फे त्यांना विचारणा होऊ लागली. प्राध्यापक म्हणून नोकरी करत असतानाच ते नाटकही करत होते. यानंतर व्यावसायिक रंगभूमीची ओढ त्यांना पुन्हा मुंबईत घेऊन आली. मग त्यांनी "नाट्यसंपदा', "नाट्यमंदार', "धि गोवा हिंदू असोसिएशन' आणि "चंद्रलेखा'च्या नाट्य संस्थेतर्फे सादर झालेल्या नाटकांतून कामे केली. "गुड बाय डॉक्‍टर', "गोष्ट जन्मांतरीची', "चांदणे शिंपित जा', "बेईमान', "अखेरचा सवाल', "घरात फुलला पारिजात', "चाफा बोलेना' अशी अनेक नाटके केली. "संगीत मत्स्यगंधा' या नाटकात त्यांनी साकारलेला भीष्म गाजला. 
कमलाकर तोरणेदिग्दर्शित "ज्योतिबाचा नवस' हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर "सिंहासन', "बाळा गाऊ कशी अंगाई', "आपली माणसं', "आत्मविश्वास', "शाब्बास सूनबाई' हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.

तोरडमल यांनी "अगाथा ख्रिस्ती'च्या इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद केला आहे. र. धों. कर्वे यांनी लिहिलेल्या "बुद्धिप्रामाण्यवाद' या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले आहे; तसेच "आयुष्य पेलताना' (रूपांतरीत कादंबरी), "एक सम्राज्ञी एक सम्राट' (चरित्रात्मक) आणि "भोवरा', "काळं बेट लाल बत्ती', "गुड बाय डॉक्‍टर', "संघर्ष', "सैनिक नावाचा माणूस', "लव्ह बर्डस', "म्हातारे अर्क बाईत गर्क', "मृगतृष्णा', "बाप बिलंदर बेटा कलंदर' या नाटकांचे लेखनही केले. "तिसरी घंटा' हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

Web Title: madhukar toradmal introduction