महाबळेश्‍वरला देशातील सर्वांत उच्चांकी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे, तर मॉसिनराम शहरात या कालावधीत 6,218.4 मिलिमीटरची नोंद झाली आहे, तर चेरापुंजी येथे 6,082.7 मिलिमीटरची नोंद झाली. 

महाबळेश्‍वर : सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मेघालयातील मॉसिनराम या शहराची ओळख गेल्या एक जून ते चार सप्टेंबरदरम्यान झालेल्या महाबळेश्‍वरमधील पावसाने यंदा तरी पुसली आहे. महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे, तर मॉसिनराम शहरात या कालावधीत 6,218.4 मिलिमीटरची नोंद झाली आहे, तर चेरापुंजी येथे 6,082.7 मिलिमीटरची नोंद झाली. 

पाटण तालुक्‍यातील पाथरपूंज येथेही तब्बल सात हजार मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मेघालयातील खासी पर्वत रांगांमध्ये वसलेल्या मॉसिनराम येथे सर्वात उच्चांकी पाऊस पडतो, अशी नोंद गिनेज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद आहे. तेथे मे ते ऑक्‍टोबरदरम्यान सर्वाधिक पाऊस होतो; परंतु यंदा महाबळेश्‍वरमध्ये झालेल्या पावसाने 300 इंच पावसाचा टप्पा पार केला आहे. तेरा वर्षांनंतर म्हणजेच 2006 नंतर इतका विक्रमी पावसाची येथे नोंद झाली आहे. 

सर्वाधिक पावसाची नोंद देशात चेरापुंजी येथे होत होती. मागील वर्षी चेरापुंजीला मागे टाकून जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून मेघालयातील मॉसिनराम शहराची नोंद झाली. गेल्या वर्षी चेरापुंजी हे दोन नंबरला होते. यंदा मात्र जगात सर्वाधिक पाऊस पडलेल्या मॉसिनरामला मागे टाकून महाबळेश्‍वरची नोंद झाली आहे. हवामान खात्याने नुकतीच याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

या आकडेवारीवरून यंदा मॉसिनराम शहराने आजपर्यंत साडेसहा हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे, तर महाबळेश्वरने साडेसात हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. तब्बल तेरा वर्षांनंतर एक जुन ते आजअखेर येथे 300 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे 237 इंच पावसाची नोंद झाली होती. 

पडलेला पाऊस असा... 

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार (एक जून ते चार सप्टेंबर) 
महाबळेश्‍वर (जि. सातारा) : 7,631.1 मिलिमीटर. 
पाथरपूंज (ता. पाटण) : 7,000 मिलिमीटर. 
मॉसिनराम (मेघालय) : 6,218.4 मिलिमीटर. 
चेरापुंजी (मेघालय) : 6082.7 मिलिमीटर. 

जगातील पर्यटकांचे आकर्षण

कोकण, पश्‍चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर हे असे आगळंवेगळं गिरिस्थान आहे, की या ठिकाणी नेहमी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होते. पावसाळी पर्यटनाचे मापदंड महाबळेश्वर शहराने बदलण्यास भाग पाडले असून, पावसाळ्यात सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दर वर्षी भर पडत आहे. यंदा देशातच नव्हे, तर जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून महाबळेश्‍वर शहराची नोंद झाल्याने जगातील पर्यटकांना महाबळेश्वर शहराची दखल घेणे भाग पडले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahabaleshwar has the highest rain in the country