esakal | राज्यात एका दिवसात 303 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग; 5 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona

उद्यापासून राज्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरांमध्ये मोठ्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्त असेल. 'पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोठेही गर्दी होऊ नये यासाठी आमचे मुख्य लक्ष असणार आहे. तसेच जवळपास 6 हजार पोलिस कर्मचारी आणि अधिकारी शहरभर तैनात केले जातील', अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

राज्यात एका दिवसात 303 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग; 5 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : कोरोना आता महाराष्ट्रात वेगाने पसरताना दिसतोय. यामध्ये आता राज्यातील पोलिसही अपवाद राहिले नाहीत. कारण गेल्या 24 तासांत महाराष्ट्र पोलिसांच्या 300 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, पाच पोलिसांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला, अशी माहिती पीटीआयने शुक्रवारी दिली. आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस दलातील 136 पोलिसांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्ग 303 पोलिसांना झाला आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रसार वाढल्यानंतर त्याला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त होता. यात आतापर्यंत महाराष्ट्रातील 13 हजार 180 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 2 हजार 389 पोलिसांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उद्यापासून राज्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरांमध्ये मोठ्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्त असेल. 'पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोठेही गर्दी होऊ नये यासाठी आमचे मुख्य लक्ष असणार आहे. तसेच जवळपास 6 हजार पोलिस कर्मचारी आणि अधिकारी शहरभर तैनात केले जातील', अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक एका दिवसात 14 हजार 492 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील एकूण कोरोना झालेल्यांची संख्या 6 लाख 43 हजार 289 झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 326 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत 21 हजार 359 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राला तरीही दिलासा... 

काल एका दिवसात राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी, दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी दिवसभरात 12 हजार 243 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.37 टक्के झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 3.32 टक्के इतका आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 1 लाख 62 हजार 491 सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक 40 हजार 962 रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. काल एका दिवसात पुण्यामध्ये 3 हजार 544 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

loading image
go to top