महाराष्ट्र अंनिसचा देव व धर्माला विरोध नाही : ऍड मुक्ता दाभोळकर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देव व धर्माला विरोध नाही. तर त्या नावे होणाऱ्या फसवणूक, शोषण व अंधश्रद्धेला विरोध आहे.
ऍड मुक्ता दाभोळकर
ऍड मुक्ता दाभोळकरSakal

पाली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देव व धर्माला विरोध नाही. तर त्या नावे होणाऱ्या फसवणूक, शोषण व अंधश्रद्धेला विरोध आहे. असे प्रतिपादन अंनिसच्या कार्यकर्त्या ऍड. मुक्ता दाभोळकर यांनी केले. सोमवारी (ता.21) सुधागड तालुका पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे चिवे आश्रमशाळेत आयोजित 'शैक्षणिक अभ्यासक्रम व वैज्ञानिक दृष्टीकोन' या कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून मुक्ता दाभोळकर बोलत होत्या.

गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दाभोळकर म्हणाल्या की मोठ्यांमुळे लहानपणी मूलांच्या मनामध्ये अव्यक्त भीती बसते. आणि ती मोठेपणी तशीच राहते. शिक्षणातील गाभा घटक व जीवन कौशल्ये यामध्ये चिकित्सक वृत्ती आहे. निरीक्षण तर्क, अनुमान व निष्कर्ष लढविला तर अंधश्रद्धेला कोणी बळी पडणार नाही. माणसांनी विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी घेतली नाही. विज्ञानाची करणी स्वीकारली पण विचारसरणी स्वीकारली नाही.

माणूस विज्ञान तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय प्रगती करू शकत नाही. ज्ञान प्राप्तीची सर्वात खात्रीशीर पद्धत म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. यामध्ये कार्यकारणभाव महत्वाचा आहे. सगळ्या गोष्टींची उत्तरे मला माहित आहे असे विज्ञान कधी म्हणत नाही. पण या प्रश्नांची उत्तरे कशी मिळतील त्याचे मार्ग मला माहिती आहेत असे विज्ञान सांगते. विज्ञान नेहमी नम्र असते. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे विचार करण्याची पद्धती आहे. असे दाभोळकर म्हणाल्या. त्यांनी यावेळी गॅलिलिओ, ब्रुनो यांची उदाहरणे दिली. त्यांनी शब्द प्रामाण्य व ग्रंथ प्रामाण्याला नाकारले.

युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती झाली ती फक्त तंत्रज्ञानात झाली नाही तर तेथील समाजात देखील झाली. वैज्ञानिक दृष्टीकोणाचा विचार घेतल्याने जग बदलेल की नाही माहीत नाही पण तुम्ही स्वतः बदलाल हे नक्की. वैज्ञानिक दृष्टिकोन सांगते की तपासा आणि स्वीकारा, वैज्ञानिक दृष्टीकोन आपल्याला निर्भय जगण्यास शिकविते. विज्ञान हे जीवनाची दृष्टी आहे. गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास म्हणाल्या की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. शिक्षक ही एकच व्यक्ती समाज घडवू शकते व बदल करू शकते.

या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, अंनिस जिल्हा अध्यक्ष विवेक सुभेकर, कार्याध्यक्ष मोहन भोईर, प्रधान सचिव संदेश गायकवाड, अमित निंबाळकर, मुख्याध्यापक संदेश पिंगळे व जयवंत गुरव व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अशोक तुरे यांनी केले.

शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे

यावेळी शिक्षकांनी विविध प्रश्न विचारले. ग्रहण लागते तेव्हा अन्न ग्रहण करणे, भाजी चिरणे याने कोणतीही बाधा होत नाही. मानवी जीवनावर काहीच परिणाम होत नाही. आत्म्याशी संवाद साधता येते का व भूत असते का.? हे सर्व मनाचे खेळ असून काल्पनिक आहे. भूत पिच्छाच, भानामती, करणी डायन, चेटकीण हे सर्व थोतांड आहे. पंचांगमध्ये जी तिथी व आकाशाची स्थिती बरोबर दिली असते ती खरी असते. पण ती परिस्थिती अशी असेल तर तुमच्या आयुष्यात हे बदल घडतील हे सांगणे धादांत खोट आहे. कोणतेही ग्रहतारे माणसाच्या आयुष्यावर परिणाम करत नाहीत हे सिद्ध झाले आहे.

जोतिषांना अंनिसने दिलेले 21 लाखांचे आव्हान अजूनही कोणी स्वीकारलेले नाही. खगोलशास्त्र विज्ञान आहे पण जोतिषशास्त्र हे विज्ञान नाही. विज्ञानात गृहीतक आवश्यक आहे. माझे गृहितक मी तपासले पाहिजे. स्वतःच्या धारणा बदलणे आवश्यक आहे. बाह्यबल लागल्याशिवाय कार्य होत नाही. सध्या छद्म विज्ञानाचा सुळसुळाट आहे. विज्ञाच्या भाषेच्या मुलामा चढवून व विज्ञानाची भाषा वापरून अंधश्रद्धा पसरवली जात आहे व यातून सुशिक्षितांना फसविले जाते. हिप्नॉटिझम हे स्वयंम सूचनेवर आधारित आहे. अंनिसचा त्यावर विश्वास नाही. वास्तुशास्त्र, ज्योतिशास्त्र व न्यूमेरॉलॉजी (अंकशास्त्र) शास्त्र नाही. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार अंगात येऊन चमत्काराचे दावे करणे हा गुन्हा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com