
Maharashtra Winter Session : आमदार आई अन् बाळाचं मुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक; पाहा Video
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला एका महिला आमदारामुळे. या आमदार आपल्या अडीच महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन अधिवेशनासाठी आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आईसह बाळाचंही कौतुक केलं आहे.
नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन अधिवेशनात हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी बाळासह या आमदार आईचंही कौतुक केलं. शिंदे यांनी सरोज अहिरे यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. यावेळी त्यांचे पती आणि सासू हेही उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासह सरोज अहिरे यांच्याही तब्येतीची चौकशी केली. या दोन्ही जबाबदाऱ्या एकावेळी पार पाडणं आव्हानात्मक आहे, पण तुम्ही दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहात, अशा शब्दांत त्यांनी अहिरे यांचं कौतुकही केलं आहे.
हेही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
यावेळी अहिरे यांनी सांगितलं की, आपलं अडीच महिन्यांचं बाळ प्रशंसक त्यांच्याशिवाय राहत नाही. आणि अधिवेशनात सामान्यांचे प्रश्न मांडणंही महत्त्वाचं होतं. त्यामुळे आपण बाळाला घेऊनच थेट आलो.
मतदारसंघाचे प्रश्न विधानसभेत मांडणं आवश्यक आहे, तसंच अडीच महिन्यांच्या बाळाची आई हेही कर्तव्य पार पाडायचं आहे. त्यामुळे आपण दोन्ही कर्तव्ये एकाच वेळी बजावत आहे, असंही अहिरे यांनी सांगितलं. विधानभवनातल्या लहान बाळांसाठीच्या विशेष कक्षात या लहान बाळाला त्यांनी ठेवलं होतं.