
राज्यातील ३२ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली; परंतु, दीड महिना उलटूनही त्यांची नियुक्ती झालेली नाही.
Assistant Commissioner of Police : पदोन्नती दिली; पण नियुक्तीचा विसर
नाशिक - राज्यातील ३२ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली; परंतु, दीड महिना उलटूनही त्यांची नियुक्ती झालेली नाही. सहायक आयुक्तपदी पदोन्नती होऊन या अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकाचीच जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने त्यांना नियुक्तीच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. यात नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील दोन तर महाराष्ट्र पोलिस अकादमीतील एका पोलिस निरीक्षकाचा समावेश आहे.
अपर पोलिस महासंचालकांच्या आदेशाने ९ डिसेंबर रोजी राज्यातील ३२ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीने सहायक पोलिस आयुक्त तथा उपअधीक्षकपदी बढती देण्यात आली. त्यानुसार त्यांच्या बदल्यांचा आदेशही जारी करण्यात आला. परंतु, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या आदेशाला दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे नियुक्ती करण्याचा विसर सरकारला पडला की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील पदोन्नती व बदल्यांचे सत्र थांबले होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलिस दलातील बदल्याचे सत्र सुरू आहे. त्याचप्रमाणे, पदोन्नतीने बदल्याही केल्या जात आहेत. मात्र त्यातही वारंवार फेरबदल होत असल्याने बदली झालेल्या अधिकाऱ्यांना पुढच्या दोन दिवसात पुन्हा बदल्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यात पदोन्नतीने बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्तीच न झाल्याने त्यांच्यासमोरही मोठा पेच उभा राहिला आहे.
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील दोन तर महाराष्ट्र पोलिस अकादमीतील एका पोलिस निरीक्षकाची सहायक आयुक्तपदी पदोन्नतीने बदली करण्यात आलेली आहे. परंतु नियुक्तीची झाली नसल्याने त्यांना सध्याच्या कार्यरत ठिकाणाहून पदमुक्तही होता येत नाही.
१७५ अधिकाऱ्यांची होणार पदोन्नती
महाराष्ट्र पोलिस दलातील १७५ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती मिळणार आहे. यापैकी ३२ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पदोन्नतीचे आदेश जारी झाले आहेत. उर्वरित पोलिस निरीक्षकही पदोन्नतीच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या पदोन्नती सेवा संवर्गानुसार होत असल्याने त्यास काहीसा विलंब होत असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.