Maharashtra Budget 2019 : कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) विधानसभेत सादर केला.

Maharashtra Budget 2019 : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) विधानसभेत सादर केला. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला असल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटले आहे.

कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद करण्यात आली असून बळीराजा योजनेसाठी 1 हजार 530 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बळीराजाचे जीवनमान उंचावण्याचे सरकारचे ध्येय असून गेल्या 4 वर्षांत 140 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीही देण्यात आला असून जलयुक्त शिवार योजनेसाठी 8 हजार 946 कोटींचा निधी दिला असल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

जलयुक्त शिवार योजनेत 25 लाख गावे टंचाईमुक्त करण्याचे आव्हान असून सूक्ष्मसिंचनासाठी 350 कोटींचा निधी राखून ठेवणार आहे. तसेच 260 सुधारित सिंचन प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर असून दुष्काळी भागात 'मागेल त्याला शेततळे' ही योजना राबवण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण 1 लाख 67 हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

चंद्रपूर, जामखेड, यवतमाळ, पेठ येथील अन्न व कृषी विद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये संशोधनासाठी 600 कोटींची तरतूद करण्यात आली.

'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' यावर भारतीय नागरिकांचा विश्वास असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Budget 2019 A provision of Rs 2 thousand 720 crores for agricultural irrigation scheme