
Budget 2023: भाषा अन् संस्कृतीसाठी अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा;'येथे' होणार मराठी भाषेचं विद्यापीठ
मुंबईः राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील विविध घटकाला दिलासा देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आहे. विशेष म्हणजे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवण्याठी त्यांनी केलेल्या घोषणा विशेष महत्त्वाच्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. राज्यात पहिल्यांदाच आयपॅडमधून अर्थसंकल्प वाचन करण्यात आला. 'टिकवावे धन ज्याची आस करुन' या ओवीने फडणवीसांनी सुरुवात केली.
अमरावती जिल्ह्यातल्या रिद्धपूर येथे मराठी भाषेचं विद्यापीठ करण्याची घोषणा अर्थमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. यासह अनेक ठिकाणी नाट्यगृह, चित्रनगरींसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आलीय.
फडणवीसांचा अर्थसंकल्प पंचामृतांवर आधारलेला...
शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी
महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास
भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास
रोजगार हमीतून विकास
पर्यावरणपूरक विकास
अर्थमंत्र्यांनी भाषा, कला, संस्कृतीसंदर्भात केलेल्या घोषणा
श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार
विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे
मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे
सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये
राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये
दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी 115 कोटी रुपये
कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना
विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त 10 कोटी रुपये
स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा