
Maharashtra Budget Session: व्हीपवरून शिवसेना-ठाकरे आमनेसामने; अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजणार
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत शिवसेनेच्या वकिलांनी व्हीप बजावून कारवाई करणार नसल्याचा शब्द दिला होता. यानंतरही शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी रविवारी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. सत्तासंघर्ष, नाव- चिन्ह यानंतर आता व्हीपवरून शिवसेना-ठाकरे आमनेसामने आले आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याने विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.
या व्हीपचे पालन केले नाहीतर दोन आठवड्यानंतर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. यावर आम्हाला व्हीप मिळाला नाही आणि मिळाला तरी तो पाळणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कालपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनाला शिवसेनेच्या सर्व आमदारांनी पूर्णवेळ उपस्थित रहावे, असा व्हीप प्रतोद भरत गोगावले यांनी बजावला होता.
तर दुसरीकडे, विधानसभेत शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाने ठाकरे गट समर्थक आमदारांना व्हीप बजावल्यानंतर आता विधान परिषद शिवसेना पक्षावरही हक्क सांगण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हालचाली सुरू केल्या आहेत.
विधान परिषद शिवसेना पक्षाचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची पक्षाच्या प्रतोदपदी निवड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे शिंदेंच्या या पत्रात नमूद केले आहे.