Mumbai: राज्यातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. नागरिकांना या सेवा त्यांच्याच जिल्ह्यात सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना जिल्ह्यातच सर्व माहिती उपलब्ध होणार असून वेळ व पैशांचा अपव्यय टाळता येणार आहे.
महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणालीही विकसित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. या निधीच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जात आहे.