काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात; खर्गेंची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड आज (मंगळवार) करण्यात आली आहे. भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदारांच्या बैठकीत थोरात यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली.

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड आज (मंगळवार) करण्यात आली आहे. भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदारांच्या बैठकीत थोरात यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली.

राज्यात सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी राज्यपालांकडे केला आहे. राज्यपालांना 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. आता बाळासाहेब थोरात यांच्याकडेच गटनेतेपद देण्यात आले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तासांमधील काही तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचे थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तर या निकालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra congress president balasaheb thorat elected congress legislative party leader