esakal | महाराष्ट्र दिन - राज्याच्या स्थापनेचा जाज्ज्वल्य इतिहास

बोलून बातमी शोधा

Maharashtra Day

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

महाराष्ट्र दिन - राज्याच्या स्थापनेचा जाज्ज्वल्य इतिहास

sakal_logo
By
ज्योती देवरे

'मंगल देशा, पवित्र देशा.... प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा' असं म्हणत दरवर्षी १ मे या दिवशी सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. याच दिवशी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवसही साजरा केला जातो. या १ मे च्या दिवशी ६१ व्या वर्षात पदार्पण करत असून या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण आता महाराष्ट्रातच कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहेत.

का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन?

१९५६ च्या States Re-organisation Act नुसार भारतातील राज्यांच्या सीमा या भाषेच्या आधारे निर्धारित करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. ज्यामध्ये मराठी, कोकणी भाषिकांचा समावेश असेल. तर, गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी वेगळ्या राज्याची मागणी करण्यात आली. याच मागण्या आणि आंदोलनांच्या बळावर अखेर १ मे १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणूनच महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

असा घडला हा संघर्ष....

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून आणि अनेक लहानमोठ्या सभांमधून जळजळीत निषेध करण्यात येत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येणार होता. दुपारनंतर, म्हणजेच मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापड गिरण्यांमधील, कामगारांची चारची कामाची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चे निघाले. फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी करण्यात आली होती. कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. पण, जमावबंदीला झुगारून मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यांना उधळून लावण्यासाठी लाठीमारही करण्यात आला. पण, तरीही ते चौकातून हटत नव्हते अखेर पोलिसांना त्यांच्यावर गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते. परिणामी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी १९५७ पर्यंत जे १०६ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमतं घेत १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.

कोण कोण आणि किती राजकीय नेत्यांचा यामध्ये सहभाग होता

भारत स्वतंत्र झाला तरीही मात्र भारतातील जनता मात्र एका वेगळ्याच विळख्यात अडकून पडली होती. ब्रिटिशांनी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती मात्र ती भाषावार नव्हती. आणि देशात भाषावार प्रांत रचना असावी असा विचार देशातील प्रमुख नेत्यांनी मंडला होता जसे की लोकमान्य टिळक, म. गांधी. १९१७ मध्ये भाषावार प्रांत करण्यात यावी अशी कल्पना प्रा.विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी 'लोकशिक्षण' या मासिकातून मांडली. यातून देशाच्या विविध भागात विखुरलेले मराठी भाषिक एकत्रित येऊन त्यांचा एक स्वतंत्र मराठी भाषिक प्रांत व्हावा अशी अपेक्षा होती. १९२० साली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी हा मुद्दा मान्यही केला होता. पण जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाल तेव्हा काँग्रेसला विशेषकरून नेहरूंना हे काही मान्य होईना. नेहरूंच्या मते संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहचेल असे त्यांना जाणवू लागले.

१९४० मध्ये गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी महाराष्ट्र एकीकरण करण्याचा विषय मांडला. त्यांनी व्यापार आणि उद्योग हे भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं म्हणत काँग्रेसच्या पुढाऱ्यांवर टीका करत ते एकीकरणासाठी काहीही प्रयत्नशील नाही असं प्रतिपादन केलं.

१९४६ च्या साहित्य संमेलनात माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन करण्यात आली. १२ मे १९४६ ला संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडण्यात आला. शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला चालना देणारी 'सर्वपक्षीय एकीकरण परिषद' भरविण्यात आली. मात्र 'दार कमिशन' आणि जे. व्ही. पी. कमिटी यांनी भाषावार प्रांत रचना ही देशहितासाठी योग्य नाही असे सांगत देशाच्या एकात्मतेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो अस कारण पुढे करत आयोगाची मागणी फेटाळली.

१९५३ मध्ये फाजलअली यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपूनर्ररचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने एस एम जोशी, धनंजय गाडगीळ यांनी बाजु मांडली. यात हैद्राबाद चा प्रमुख उदाहरण म्हणून डोळ्यासमोर ठेवत मुंबईसाठी द्विभाषिक तत्व हे अनैसर्गिक आहे असे पटवून देण्यात आले. या आयोगाचा निवडा १९५५ मध्ये जाहीर झाला, आणि यातून मराठी आणि गुजराती भाषिकांचा होणार विरोध शमवायचा म्हणून काँग्रेस कार्यकारिणीने १ नोव्हेंबर १९५५ ला 'त्रिराज्य सूत्र' सुचवले. या योजनेमुळे मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याची चिन्हे दिसताच मराठी भाषिकांत असंतोष जागृज झाला. या संतापातुन 'संयुक्त महाराष्ट्र चळवळीने' पेट घेतला. त्याच बरोबर इतर कम्युनिस्ट, सोशालिस्ट, प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्रसाठीचा लढा हाती घेतला. जणू त्यांनी संयुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी रणशिंगच फुंकले.

सेनापती बापट, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, कॉ. श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे या प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ महाराष्ट्रात ज्वलंत होऊ लागली. त्यांच्या साथीला आपल्या कलेच्या माध्यमातून मराठी अस्मिता जनमाणसात रुजवण्यासाठी शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांनी प्रयत्न केले.

१६ जानेवारी १९५६ रोजी नेहरूंनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल असे जाहीर केले. आणि यातूनच या आंदोलनाच्या अग्नीत दाहकता निर्माण झाली. याचा विरोध करायला मोठ्या संख्येने मोर्चे निघाले, ते मोर्चे मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे जमले. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे प्रमुख घोषवाक्य होते. पोलिसांनी तात्काळ आंदोलन उधळून लावायला लाठीचार्ज केला मात्र या आंदोलनकर्त्यांमध्ये एव्हढी दाहकता होती की लाठीचार्ज त्यापुढे फिका पडला.

किती लोकांनी जीव यात गमावला

आंदोलनाची भीषणता पाहता ते हुसकावून लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. पण मनात पेटलेली चळवळीची ज्वाळा या गोळीबारापुढे काहीच नव्हती १०८ कार्यकर्त्यांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलत आपले उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आंदोलन आणखीनही चिघळले. तेव्हा समोर असलेल्या देशातील निवडणूक पाहता इंदिरा गांधींनी नेहरूंची समजून घातली. आणि सरकारने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी परवानगी दिली.

यात एक अजून अशी गोष्ट आहे की, नेहरूंना या प्रांतांचे/राज्याचेच नाव हे मुंबई हवे होते. मात्र थोर संतांची, बलिदानाची, दातृत्वाची, संस्कृतीची, कलेची ही महान भूमी म्हणून संपूर्ण राज्याचे नाव हे 'महाराष्ट्र' ठेवण्यात आले. या हुतातम्यांच्या बलिदानाप्रित्यर्थ सरकारने १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य केली. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते दिल्लीहून महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला गेला. आणि यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या हुतात्म्यांना वीरांजली देण्यासाठी आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती याच दिवशी झाल्यामुळे आपण १ मे हा दिन महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. पण अजूनही बेळगावाचा प्रश्न हा महाराष्ट्रासाठी कायम आहे.