डॉ. राजा दीक्षित आणि डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामे घेतले मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr raja dixit and dr sadanand more

राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.

Maharashtra News : डॉ. राजा दीक्षित आणि डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामे घेतले मागे

पुणे - राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. राज्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी या दोघांची पुण्यात भेट घेत त्यांच्या कामकाजातील प्रशासकीय हस्तक्षेप दूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर डॉ. दीक्षित आणि डॉ. मोरे यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याने या नाट्यावर पडदा पडला.

सरकारच्या भाषा विभागाने आणि वित्त विभागाने गेली वर्षभर अडवणूक केल्याचा आरोप डॉ. दीक्षित यांनी जाहीर पत्राद्वारे केला होता. विश्व मराठी संमेलनातही जाणीवपूर्वक डॉ. दीक्षित व डॉ. मोरे यांना डावलले गेल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर दोघांनीही गुरुवारी (ता. १२) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या नाराजीची दखल घेत केसरकर यांनी तातडीने पुण्याला येत या दोघांची भेट घेतली.

डॉ. मोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केसरकर यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. ‘तुम्हा दोघांचे काम अतिशय चांगले आहे, हे मी यापूर्वीही जाहीरपणे सांगितले आहे. तुमच्यासारखी माणसे या दोन संस्था उत्तमरित्या चालवण्यासाठी आवश्यक आहेत. तुमच्या सर्व अडचणींचे निवारण केले जाईल, तसेच कामकाजात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही’, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. त्यांच्या विनंतीला मान देत डॉ. दीक्षित आणि डॉ. मोरे यांनी राजीनामा मागे घेतला.

नैतिकतेचा विजय

मी दिलेला राजीनामा ही एक नैतिक कृती होती. राजकारण आणि नितीकारण, यात अंतिम विजय नितीचाच होतो, असा मला नेहमीच विश्वास वाटतो. त्यामुळे जे काही घडले, तो मला नैतिकतेचा विजय वाटतो, असे डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले.

विनाअडथळा काम करता येणार असेल, तर त्यास माझी काहीही हरकत नव्हती. त्यामुळे आश्वासनानंतर राजीनामा मागे घेतला. मंडळाच्या कामासाठी अनेक योजना विचाराधीन आहेतच. त्या विधायकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करू.

- डॉ. राजा दीक्षित

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत आमच्या अडचणी व तक्रारी जाणून घेतल्या. त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- डॉ. सदानंद मोरे