
Cabinet Meeting : विस्तारित मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; कोणते महत्त्वाचे निर्णय घेणार?
Maharashtra Cabinet Meeting : सत्तेत आल्यानंतर 40 दिवसांनी काल शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. त्यानंतर आज विस्तारित मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे. यापूर्वी केवळ सीएम शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येच मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडत होत्या. यावरून विरोधी पक्षाकडून दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली जात होती. मात्र, काल अखेर 40 दिवसांनी का होईना पण अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. त्यानंतर आज पहिलीच विस्तारित मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बंडखोरी करून सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, त्याला काही केल्या मुहूर्त सापडत नव्हता. मात्र अखेर काल 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून, आता सर्वांचे लक्ष कोणतं खातं कोणत्या मंत्र्याला मिळत याकडे लागले आहे.
दरम्यान, यापूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे आणि फडणवीस अशा दोघाचेच मंत्रिमंडळ होते. त्यामुळे विरोधी पक्षाकडून वेळीवेळी टीका केली जात होती. त्यामुळे अनेकदा हे दोन्ही मंत्री टिकेचं धनी होत होते. सत्तेत आल्यानंतर पार पडलेल्या यापूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा शिंदे आणि फडणवीस यांनी घेतले आहेत. तसेच नामांतराच्या आणि आरे कार शेडच्या निर्णयामध्येदेखील शिंदे सरकारमध्ये बदल करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार आणि आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.