मोतीबिंदू शस्त्रक्रियांमध्ये महाराष्ट्र देशात चौथे

नरेश हाळणोर
रविवार, 10 जून 2018

नेत्रदानाच्या चळवळीतून अवयवदानाची चळवळ उभी राहिली. सरकारचा उपक्रम आणि समुपदेशनामुळे नेत्रदात्यांची संख्या वाढली. आरोग्यमंत्र्यांसह संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेत्रदानाचे संमतीपत्र सादर केले. आता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी नेत्रदानाचे संमतीपत्र भरावे, असे आवाहन केले जाणार आहे. 
- डॉ. सुरेश जगदाळे (आरोग्य उपसंचालक, नाशिक) 

नाशिक : अपघातात अधू झालेली दृष्टी प्राण गमावलेल्यांच्या दृष्टिपटलांनी डोळस झाल्यास त्यासारखे श्रेष्ठ दान कोणतेच नाही. राज्यामध्ये दृष्टीबाधितांच्या जीवनात प्रकाश पेरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रबोधनात्मक जागृतीपर उपक्रमांमुळे नेत्रदान 108 टक्‍क्‍यांपर्यंत पोचलंय. देशातील तुलनेत हे प्रमाण कमी असले, तरी नेत्रदानासाठी स्वत:हून पुढे येणाऱ्या दात्यांमुळे आशादायक स्थिती आहे. त्याच वेळी मोतीबिंदू शस्त्रक्रियांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर पोचला आहे. 

राष्ट्रीय नेत्रदान कार्यक्रमांतर्गत जनजागृतीपर चळवळ सुरू केली गेली. त्याअंतर्गत आरोग्य विभागाने नेत्रदानासाठी काम करू इच्छिणाऱ्या 166 सेवाभावी संस्थांना प्रोत्साहन दिले. त्यांनी जिल्हा स्तरावर नेत्रदानाचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. शाळा, महाविद्यालयांसह गावोगावी पथनाट्य, रॅली, स्पर्धांच्या माध्यमातून प्रचार-प्रसार केला. त्याचे फलित म्हणजे मृत्यूनंतर नातलगांकडूनही नेत्रदानाचा निर्णय घेण्याचे प्रमाण वाढले. मृत्युपूर्वी संमतीपत्र देणाऱ्या नेत्रदात्यांमध्येही वाढ झाली. 

नेत्रदान व्हावे बंधनकारक 

श्रीलंकेमध्ये नेत्रदान कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे श्रीलंकेत डोळ्यांसाठीची प्रतीक्षा यादी नाही. याउलट भारतामध्ये आजही नेत्रांसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. ग्रामीण भागात अज्ञान आणि अशिक्षितपणामुळे नेत्रदान केले जात नाही. भारतातही नेत्रदान बंधनकारक करण्याची गरज आहे, असे तज्ज्ञ सांगतात. 

वृद्धांचे प्रमाण अधिक 

नेत्रदानासाठी डोळ्याचे बुबुळ सुस्थितीमध्ये असणे आवश्‍यक असते. अपघाती अथवा नैसर्गिकरीत्या दगावलेला व्यक्ती जर पन्नासपेक्षा अधिक वयाच्या असतील, डोळ्याचे बुबुळ सुस्थितीत नसेल, तर ते डोळे दृष्टिबाधितांसाठी उपयोगात येत नाहीत. नेमके असेच प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे असे डोळे अभ्यासासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वापरले जातात. 

रुग्णालयांमध्ये समुपदेशन 

मृत्यूनंतर सहा तासांच्या आत नेत्रदान आवश्‍यक असते. एखाद्याचे निधन सरकारी रुग्णालयात झाल्यास नेत्र विभागाकडून संबंधितांच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले जाते. जेणेकरून त्यांच्या संमतीने डोळे शस्त्रक्रिया करून वेळेत काढता येतात. ही शस्त्रक्रिया करताना बुबुळ, रक्तगट हेही महत्त्वाचे असते. नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर ही प्रक्रिया 
होते. 

नेत्रदान चळवळीची वैशिष्ट्ये 

- नेत्रदानात पुडुचेरी अव्वल, महाराष्ट्र तेराव्या स्थानावर 
- महाराष्ट्रासाठी 2017-18 मध्ये 7 हजार नेत्रदानाचे उद्दिष्ट, तर 7 हजार 560 दात्यांचे नेत्रदान 
- नाशिक जिल्ह्यात एप्रिल 2017 ते मार्च 2018 मध्ये 659 जणांचे नेत्रदान, 1 हजार 9 जणांचे संमतीपत्र 

मोतीबिंदू शस्त्रक्रियांची स्थिती 

- राज्याला 4 लाख 56 हजार 11 मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट 
- प्रत्यक्षात 6 लाख 84 हजार 386 रुग्णांचे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया 
- पुडुचेरी, गुजरात, पंजाब आघाडीवरची राज्ये 

Web Title: Maharashtra is Fourth state in cataract surgery