
महाराष्ट्र सरकारकडून उद्योगांना सहकार्य मिळेल, त्यासाठी सवलती आणि पायाभूत सुविधा मिळतील, अशी खात्री पटल्यामुळेच जगभरातील कंपन्यांनी महाराष्ट्रात त्यांचे उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे.
Eknath Shinde : महाराष्ट्र सरकारकडून उद्योगांना सहकार्य मिळेल
पुणे - महाराष्ट्र सरकारकडून उद्योगांना सहकार्य मिळेल, त्यासाठी सवलती आणि पायाभूत सुविधा मिळतील, अशी खात्री पटल्यामुळेच जगभरातील कंपन्यांनी महाराष्ट्रात त्यांचे उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळेच दावोसमध्ये हजारो कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. या करारानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग सुरु होणार आहेत. शिवाय विविध देशांच्या प्रमुखांनीही महाराष्ट्रात विविध उद्योग सुरू करण्याचे आश्वासन दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता.२१) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नेमके किती कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले, हे आताच सांगता येणार नाही. कारण दावोसमध्ये गेलेली राज्य सरकारची टीम अद्याप परतलेली नाही. ही टीम परत आल्यानंतरच कोणत्या कंपन्यांनी किती आणि कोठे गुंतवणूक केली, याचे चित्र स्पष्ट होईल. हे सामंजस्य करार आकडेवारी वाढविण्यासाठी नसून प्रत्यक्षात राज्यात उद्योग सुरु व्हावेत, यासाठी केलेले आहेत. त्यामुळे याबाबत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांत फारसे तथ्य नाही. विरोधकांना सध्या सरकारला विरोध करण्याशिवाय दुसरं काही कामही नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. विरोधकांनी कितीही आरोप करू द्या, आम्ही त्यांना कामातून विरोध देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कार वितरण समारंभासाठी मुख्यमंत्री पुण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘दावोसमध्ये राज्य सरकार, देशाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रति विश्वास पाहायला मिळाला. मागच्या वेळी उद्योगांचे काय झालं. त्याची उलाढाल किती आणि ताळेबंद काय, याच्या आकडेवारीत मला जायचं नाही. राज्यात उद्योग येत आहेत. या उद्योगांना पाठिंबा देणारे देशातील लोक तेथे होते. शिवाय अन्य काही देशांचे प्रमुख तिथे भेटले. त्यांनीही त्यांच्या देशाच्यावतीने महाराष्ट्रात विविध उद्योग सुरु करण्यासाठी आश्वासन दिले आहे. हे सर्व सामंजस्य करार हे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले असून, याची खात्री येणाऱ्या काळात पटेल.’ 'आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ'.
‘कृषी, सहकारात शरद पवार यांचे मोठे योगदान’
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे देशातील कृषी व सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. देशाचे कृषीमंत्री असताना पवार यांनी कृषी व सहकार क्षेत्रात चांगले बदल केले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला. एवढेच नव्हे तर, शेतीशी संबंधित परदेशी तंत्रज्ञान देशात आणले. त्यांचे या क्षेत्रातील मोठे योगदान आहे. हे मी नाकारू शकत नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पवार यांच्या अनुभवाचा आधार घेत असतो आणि घेतला जाईल. त्यांनी केलेल्या सूचना आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी कायम उपयुक्त असते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांच्या कृषी व सहकार क्षेत्रातील अनुभवाची प्रशंसा केली.