Health Department Exam : आरोग्य विभागाकडून 'न्यासा'ला नोटीस

गैरव्यवस्थापणाचा ठपका; ४८ तासात मागवला खुलासा
rajesh tope
rajesh topesakal

पुणे : राज्यातील साडे आठ लाख उमेदवारांच्या भवितव्याचा बट्ट्याबोळ करणाऱ्या न्यासा कंपनी विरोधात मंगळवारी आरोग्य विभागाला जाग आली. आरोग्य सेवेतील गट क च्या लेखी परीक्षेतील तक्रारींसंदर्भात आरोग्य विभागाने न्यासा कम्युनिकेशनला नोटीस बजावली आहे. प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचणे, न्यासाचे अप्रशिक्षित मनुष्यबळ, चुकीची प्रश्नपत्रिका आदी बाबत ४८ तासात खुलासा मागविण्यात आल्या आहे.

रविवारी (ता. २४) सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क ची लेखी परीक्षा पार पडली. यावेळी पुण्यासह नाशिक, मुंबई, अमरावती आदी दहापेक्षा जास्त ठिकाणांहून परिक्षे संदर्भात तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची तपशीलवार माहिती घेत आरोग्य विभागाने ही नोटीस बजावली आहे. हे होत असतानाच येत्या रविवारी (ता.३१) आयोजित गट-ड ची जाहीर केलेले प्रवेशपत्र मागे घेण्यात आले आहेत. उमेदवारांना लवकरच नवीन प्रवेशपत्र देण्यात येईल, अशा आशयाचा संदेश उमेदवारांच्या मोबाईलवर पाठविण्यात आला आहे. यामुळे रविवारची परीक्षा होणार की नाही, याबद्दल आता संभ्रमाचे वातावरण आहे. या संबंधी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केले असता अधिकृत उत्तर मिळाली नाही.

आरोग्य विभागाने असा मागितला खुलासा

पुण्यातील आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ.आर.एस.अडकेकर यांच्या सहिनीशी न्यासाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. ज्यात राज्यातील १४ केंद्रांवरील तक्रारींचा तपशील दिला आहे. तसेच या समस्या उद्भवल्यावर आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनाही दर्शवल्या आहेत. त्याचवेळी न्यासाकंपनी कुठे कमी पडली हे सुद्धा लिहिण्यात आले आहे. या चुकांच्या आधारे न्यासाच्या गैरव्यवस्थापन, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा, चुकीचे नियोजन, प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा नसणे आदी ठपका ठेवण्यात आला आहे.

'सकाळ'ने दिली होती पूर्वसूचना

पुणे जिल्ह्याच्या लोहमार्ग पोलीस भरतीतील अनुभवाच्या आधारे सकाळने संभाव्य तक्रारींची कल्पना रविवारी (ता.२४) प्रसिद्ध झालेल्या बातमीत दिली होती. न्यासकडे मनुष्यबळाचा तर अभाव आहे, त्याच बरोबर त्यांच्याकडे परीक्षा पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजनाचा अभाव असल्याचे यात दिसून आले होते. उमेवारांच्या तपासणीसाठी, परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी, प्रश्नपत्रिकांच्या हाताळणीसाठी कुशल मनुष्यबळ न्यासकडे नसल्याचे सकाळने म्हटले होते. याची पुनरावृत्ती आरोग्य सेवेत ही पाहायला मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com