देशात कापूस उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cotton production

महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा ही तीन प्रमुख कापूस उत्पादक राज्ये असून यात देशातील एकूण उत्पादनाच्या ६५ टक्के कापूस पिकतो.

Cotton production : देशात कापूस उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर

औरंगाबाद - महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा ही तीन प्रमुख कापूस उत्पादक राज्ये असून यात देशातील एकूण उत्पादनाच्या ६५ टक्के कापूस पिकतो. २०२२-२३ या वर्षात कापसाच्या ४० लाख गाठी निर्यात होण्याचा अंदाज आहे. यात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. मात्र, अतिवृष्टी, सततचा पाऊस यामुळे राज्यात कापूस उत्पादनाला फटका बसत आहे. २०२०-२१ या वर्षाच्या हंगामात महाराष्ट्रात १०१.०५ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. त्या तुलनेत २०२१-२२ या हंगामात ७१.१८ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. दुसरीकडे गुजरात, तेलंगणातील उत्पादन मात्र वाढत आहे.

सतत पाऊस, अतिवृष्टीचा फटका

शेतकऱ्यांना यावर्षी अतिवृष्टी, सततच्या पावसाचा फटका बसला आहे. कित्येक ठिकाणी कापूस एक, दोन वेचणीत संपला आहे. त्याचा शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत आहे. २०२२-२३ या हंगामात मध्यम धाग्याच्या कापसाला ६ हजार ८० तर लांब धाग्याच्या कापसाला ६ हजार ३८० रुपये हमी भाव देण्यात आला आहे. मात्र, खासगी जीनिंग, व्यापाऱ्यांकडे कापसाला यापेक्षा जास्त दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांचा ओढा व्यापाऱ्यांकडे सर्वाधिक आहे.

४० लाख गाठी निर्यातीचा अंदाज

२०२२-२३ या हंगामात देशातून ४० लाख गाठी कापसाची निर्यात होण्याचा अंदाज आहे. यात परिस्थितीनुसार वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. साडेपाच क्विंटल कापसापासून १ क्विंटल गाठ (रुई) तयार होते तर एका गाठीत १६५ ते १७० क्विंटल कापूस असतो. महाराष्ट्रात २०२०-२१ या हंगामात १०१.०५ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. त्या तुलनेत २०२१-२२ या हंगामात ७१.१८ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे तर चालू हंगामात २०२२-२३ या वर्षाच्या हंगामात ८०.२५ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. संपूर्ण हंगाम संपेपर्यंत यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर मागील दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी गुजरातमध्ये कापूस उत्पादन वाढले आहे.