आज दिवसभरात झालेल्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

आज दिवसभरात झालेल्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

पण मी राजेंद्र गावीत यांची सभा सोडून आलो नाही

स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याचं काम या एकनाथ शिंदेंनी केलं. घरी बसून आदेश देणारा मी मुख्यमंत्री नाही. जेव्हा दुसऱ्यावर संकट येतं स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत माझी आई हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होती.

मी पालघरचे राजेंद्र गावीत यांच्या प्रचारात होतो. मला डॉक्टरांचा फोन आला. मी गावीत यांना सांगितलं, ते म्हणाले सर्व तयारी झाली आहे. सर्व कार्यकर्ते वाट पाहात आहेत. निवडणूकीमध्ये चार पाच सभा त्यांनी आयोजित केल्या होत्या. मला माहिती असताना देखील मी डॉक्टरांना सांगितलं संध्याकाळी येतो. जवळपास आई गेली होती. पण मी राजेंद्र गावीत यांची सभा सोडून आलो नाही. असं काम केलं हा आमचा गुन्हा आहे? - एकनाथ शिंदे

राज ठाकरे काय मागत होते याचे आम्ही साक्षीदार आहोत - शिंदे

राज ठाकरे काय मागत होते? जिथं शिवसेना नाही तो भाग मला द्या मी वाढवतो, नारायण राणेंचा काय गुन्हा आहे. राज साहेबांनी काय मागीतलं होतं याचे आम्ही साक्षीदार आहोत. आता आम्हाला भेटतात सगळे, पूर्वी आम्हाला बंधन होतं आता आम्ही मोकळे आहोत. त्यामुळे आता विचारांची देवाण घेवाण होते. - एकनाथ शिंदे

या एकनाथ शिंदेवर १०९ केसेस आहेत, तुमच्यावर किती?;मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर घणाघात

आज का माणसं सोडून जात आहेत? 50 लोकांनी खोके घेतले. रामदास कदम यांनी अख्खं आयुष्य संघटनेसाठी न्योछावर केलं. शेकडो केसेस अंगावर घेतल्या तुम्ही त्यांना गद्दार म्हणताय. तुम्हाला बोलताना काहीतरी वाटलं पाहीजे. तुम्हा काय केलं. तुमच्यावर किती केसेस आहेत. या एकनाथ शिंदेंवर १०९ केसेस आहेत. तुम्हाला बोलायचा अधिकार काय? - एकनाथ शिंदे.

तो पंतप्रधान कसा होऊ शकतो? 

बाळासाहेबांचे विचार हेच आमची संपत्ती आहे. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस - राष्ट्रवादीला दूर ठेवलं. त्यांच्याबद्दल त्यांनी काय भाष्य केली ते आपल्याला माहितेय. अशा काँग्रेसच्या राहुल गांधींनी देशाचे पंतप्रधान करायला निघालात. जो त्या पक्षाचा अध्यक्ष होण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही तो पंतप्रधान कसा होऊ शकतो? तुम्हा अशा लोकांसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मतं मागतो, यापेक्षा राज्याचं दुर्दैव काय असू शकतं? - एकनाथ शिंदे

सत्तेसाठी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला

सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पक्ष दावणीला बांधला. धनुष्यबाण सोडवण आणि शिवसेना वाचवण्याचं काम केलं. ज्या लोकांच्या बरोबर आपण निवडणूक लढवली त्यावेळी प्रत्येक पॅम्प्लेटलर बाळासाहेब आणि मोदींचा फोटो होता. मग सरकार कोणासोबत स्थापन झालं पाहिजे होतं? त्यावेळी आम्ही भूमिका घेतली. - एकनाथ शिंदे

तुम्ही त्यांना वडील म्हणून छोटं करू नका - एकनाथ शिंदे

तुम्ही खोके, गद्दार म्हणून किती पाप झाकणार? बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते हे किती वेळा सांगणार? हे जगाला मान्य आहे. पण बाळासाहेब तुमचे वडील असले, तरी ते सगळ्या शिवसैनिकांचं दैवत होते. तुम्ही त्यांना वडील म्हणून छोटं करू नका महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही.

तिच -तिच आदळाआपट त्याला काय उत्तर द्यायचं - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे - त्यावेळची गर्दीची तुलना करायला आलो नाहीये. मी उत्तर द्यायला आलेलो नाही, उत्तर आरोप आणि टीकेला द्यायचं असतं. तो- तोच थैय-थैयाट तिच आदळाआपट त्याला काय उत्तर द्यायचं. त्यांच्याकडे दोनत शब्द आहेत खोके आणि गद्दर. आम्हाला उत्तर द्यायची गरज नाहीये, या सभेने तुम्हाला उत्तर दिलं आहे, असे खेडच्या सभेत भाषणाला सुरूवात करताना एकनाथ शिंदे म्हणाले.

 उद्धव ठाकरे तुम्ही वडीलांच्या विचाराशी बेईमानी का केलीत? - रामदास कदम

रामदास कदम - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी उद्धवजी तुम्ही गद्दारी का केलीत? २००९ मध्ये मला गुवाघर मधून तिकीट दिलं. मी दापोली मधून मागीतलं होतं. तिथं आपल्याचं एका नेत्याला सांगून मला पाडलत. कशासाठी तर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत म्हणून.. राज्याचा विधानसभेचा विरोधीपक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो. कदाचीत शिवसेनाप्रमुखानी मला मुख्यमंत्री मला केलं असतं. पण मी मुख्यमंत्री व्हायला नको म्हणून तुम्ही मला २००९ मध्ये पाडलत. नाहीतर जाधवची औकात काय मला पाडायची, असले शंभर जाधव खिशात घेऊन फिरतो. उद्धवजी तुम्ही मला पाडलंत, मला धोका दिलात..

एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अभिमान वाटतो - गजानन किर्तीकर

एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ४० आमदार १० खासदार आणि आठ मंत्री यांनी उठाव केला. याला क्रांती म्हणावी लागेल. याची चर्चा सगळ्या देशात झाली. ज्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवशाही राज्यात प्रकट झाली, अशा प्रकराचे ठासून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अभिमान वाटतो. - गजानन किर्तीकर

 मुख्यमंत्री शिंदे खेडमधील सभास्थळी दाखल!  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमधील सभास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील रत्नागीरीतील खेडमध्ये असलेल्या गोळीबार मैदानात सभा घेतली होती. त्यानंतर आज शिंदे देखील त्याच ठिकाणी उत्तर सभा घेत आहेत. दरम्यान आज ते ठाकरेंच्या टीकेवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रधर्म हा भाजप पक्षाचा कणा- पंकजा मुंडे

बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मुंडे बोलत होत्या.

माझ्या पराभवाचे दुख राज्यातील जनतेला झाले- पंकजा मुंडे

संभाजी नगरमध्ये हिंदू समाजाचा मोर्चा

संभाजी नगरमध्ये हिंदू समाजाचा मोर्चा चालू झाला. हा मोर्चा संभाजी नगर नावाच्या समर्थनार्थ या मोर्चाचे आयोजन केले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला.

LIVE Update: पुण्यात बुलेट राजांवर कारवाई सुरू!

पुणे शहरात करकर्श आवाज काढून बुलेट सारख्या गाड्या चालवायचे प्रकार पुणे शहरातील अनेक भागात पाहायला मिळतात. पुण्यातील येरवडा भागात देखील असेच गाडी चालवून जाणूनबुजून फटाके सारखे आवाज काढून स्थानिकांना त्रास होईल असे तरुण गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घालत होते. याच तरुणांवर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. दुचाकीला बनावट सायलेन्सर लावुन कर्णकर्कश आवाज करणाऱ्या चालकांवर येरवडा वाहतुक विभागाने नुकतीच कारवाई केली आहे. बुलेट गाडीला दुसरे सायलेस्नर लावुन फटाक्‍यासारखा आवाज करणाऱ्या १२ बुलेटचालकांवर येरवडा वाहतुक विभागाने कारवाई केली आहे.

'शेतकरी जगला तर तुम्ही जगाल', अवकाळीवरून संभाजीराजे संतापले

गेल्या काही दिवसांपासून वादळी वारा आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचलेली नाही. राज्याच्या या कारभारावर खासदार संभाजी राजे छपत्रती यांनी संताप व्यक्त केली आहे. इतकी असंवेदनशीलता कुठून येते ? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल. अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली

खेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडच्या गोळीबार मैदानात आज जाहीर सभा आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. 

छ. संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा 

छ. संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही हा मोर्चा काढण्यात आला आहे.

धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चोरट्यांचा डल्ला

काल मुंबईजवळील मीरा रोड येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबारावेळी चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान कार्यक्रमात सहभागी महिलांचे सुमारे 4 लाख 87 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची माहीती समोर आली आहे.


MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली अध्यक्ष शरद पवारांची भेट

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्ट मंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट घेतली. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न २०२५ पासून आयोगाने लागू केल्यानंतर शरद पवार यांचे आभार मानले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात देखील चर्चा झाली. ३० मार्च रोजी शरद पवार करणार स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर