
Marathi NewsUpdate : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
दिल्लीची हवा पुन्हा दूषित, सीपीसीबीने दिली माहिती
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 'अतिशय खराब' श्रेणीत गेला आहे.
राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत सुनावणी संपली
निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली आहे. २४ नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे.
अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाने केली आहे. निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत सुनावणी सुरु आहे.
अभिषेक मनु सिंघवी उशिरा पोहोचल्याने उशिरा सुनावणीला सुरुवात
शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी उशिरा पोहोचल्याने उशिरा सुनावणीला सुरुवात झाली आहे. जवळपास 50 मिनिटं ते उशिरा दाखल झाले. सध्या अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत.
पार्थ पवार निवडणूक आयोगात दाखल
सुनावणीसाठी पार्थ पवार निवडणूक आयोगामध्ये दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबतच्या सुनावणीसाठी नेते आयोगात दाखल
निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी अनेक मोठे नेते आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोंधळ; अजित पवार बोलत असताना गोंधळ
भंडाऱ्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अजित पवार बोलत असताना गोंधळ निर्माण झाला. यावेळी अजित पवारांनी जमलेल्या सामान्य नागरिकांना शांत बसण्याचे आवाहन केले.
अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस निर्दोष
अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस निर्दोष असल्याचे समोर आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नव्हते अशी माहिती अधिकारातून समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश नाहीत अशी माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांच्या आरटीआय अर्जातून माहिती समोर आला आहे. जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मनोज जरांगे देणार ऐतिहासिक लाल महलाला भेट
मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलनाच्या भूमिकेत असलेले मनोज जरांगे पाटील यांची आज पुणे जिल्ह्यातील खराडी येथे सभा झाली. या सभेनंतर मनोज जरांगे हे आता थोड्याच वेळात पुणे शहराल ऐतिहासिक वारसा असलेल्या लाल महाल येथे येणार आहेत. तसेच जरांगे यांच्या हस्ते पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ मंदिरात बाप्पाची आरती देखील करण्यात येणार आहे.
अल्पवयीन मुलीचे मुंडन सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर सुळेंनी व्यक्त केला संताप
अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करुन तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक आहे.कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही; मनोज जरांगेंचं वक्तव्य
मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही. प्रत्येकाचा सुख, दुःखात माझा मराठा धावून गेला. मराठ्यांनी कधीच कोणाची जात शोधली नाही. मराठा समाजानं प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं. मराठा सढळ हाताने इतरांना देत राहीला. आरक्षण देताना ही, कोणाला मिळाले आणि आम्हाला का मिळाले नाही याविषयी ब्र शब्द काढला नाही.असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज दुपारी विधानसभा अध्यक्षांसोबत बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज दुपारी विधानसभा अध्यक्षांसोबत बैठक होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. सह्याद्री अतिथीगृह नुतनीकरणाच्या निमित्ताने बैठक आयोजित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. त्याअनुषंगाने बैठकीत चर्चेची दाट शक्यता आहे.
आजपासून पुण्यातील संगमवाडीतील निकम फार्म येथे बागेश्वर महाराजांच्या संत्सग कार्यक्रमाचे आयोजन
बागेश्वर महाराज यांच्या संत्सग कार्यक्रमाचे आयोजन आजपासून पुण्यातील संगमवाडीतील निकम फार्म येथे करण्यात आलंय. भाजप चे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या ठिकाणी भव्य दरबार उभारण्यात आला असून भाविकांसाठी मोठ्या एल ई डी स्क्रीन लावण्यात आल्या आहे.
पुढील २ दिवस या ठिकाणी 'हनुमान कथा सत्संग आणि दिव्य दरबार' सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाला शब्द निर्मूलन समिती तसेच इतर संघटनांनी विरोध केल्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आज सुनावणीला उपस्थित राहणार?
अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आज सुनावणीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. निवडणुक आयोगात राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीला अजित पवार राहणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दुसरीकडे शरद पवार देखील दिल्लीत थोडयाच वेळात दाखल होणार आहेत. आजचा सुनावणीला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या मदत आणि बचाव कार्याची घेतली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या मदत आणि बचाव कार्याची माहिती पंतप्रधानांनी घेतली. पीएम मोदी म्हणाले की, केंद्र सरकारकडून आवश्यक बचाव उपकरणे आणि संसाधने पुरविली जात आहेत. केंद्र आणि राज्य संस्थांच्या परस्पर समन्वयाने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य राखण्याची गरज आहे.
बिहारमधील लखीसराय येथे गोळीबार; एकाच कुटुंबातील अनेकांना घातल्या गोळ्या
बिहारमधील लखीसराय येथे झालेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातील अनेकांना गोळ्या घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करतेवेळीचा व्हिडीओ समोर आला आहे.
पुण्यात कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून
पुण्यात कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला आहे. पाठलाग करून कोयत्याने हल्ला केला आहे. इमारतीच्या छतावर कोयत्याने वार करत तरुणाचा खून केला आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकार घडला आहे.
किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार केला आहे. पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली आहे. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सिद्धार्थ आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून खून केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज मनोज जरांगे पाटील यांची पुणे शहरात सभा
आज मनोज जरांगे पाटील यांची पुणे शहरात सभा पार पडणार आहे. सभेच्या निमित्ताने पुणे नगर रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलेला आहे. आज दिवसभर नगर रोड जड वाहतुकीस पूर्णपणे बंदी राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा? आजपासून पार पडणार नियमित सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार यासंबधीची नियमीत सुनावणी आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पार पडणार आहे. शेवटची सुनावणी 9 नोव्हेंबरला झाली होती, या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाने बोगस कागदपत्र दिल्याचा आरोप केला. आजपासून पुढचे तीन दिवस सुनावणी पार पडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? यासंदर्भात दिल्लीत निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा, देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर