समर्थांच्या शिकवणीचा विसर पडलेल्यांवर सचिन सावंत यांचा टोला
“मनाचे श्लोक” या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवून तथाकथित हिंदुत्ववादी लोकांनी सिद्ध केले आहे की त्यांनी समर्थ रामदास स्वामींचे “मनाचे श्लोक” वाचलेलेच नाहीत, असा जोरदार टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.
सावंत म्हणाले, “मनाचे श्लोक” मानवी मनाला सदाचार, आत्मपरीक्षण आणि तर्कशुद्ध विचार करण्याचा संदेश देतात. पण आज जे लोक श्रीरामाच्या नावाने धटिंगणशाही करत आहेत, ते खरं तर रावणाच्या आदर्शावर चालत आहेत.
त्यांनी पुढे म्हटले, “मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा आदर्श चारित्र्य, संयम, करुणा आणि न्यायाचा आहे. श्रीरामाच्या नावाने भय निर्माण करणे हा त्याचाच अपमान आहे.”
सचिन सावंत यांनी सरकारवरही तीव्र शब्दांत टीका केली. “चित्रपट निर्मात्यांना संरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण बाह्य संघटनांकडून दबाव टाकून चित्रपटाचे नाव बदलण्यास भाग पाडले जात असल्यास, अशा असंविधानिक कृत्यांना सरकारचा मूक पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते,” असे ते म्हणाले.
त्यांनी सरकारवर आरोप केला की, “समाजात असहिष्णुता आणि धर्मांधता वाढवून प्रगतीशील महाराष्ट्राला प्रतिगामी दिशेने नेण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे.”
“मनाचे श्लोक वाचले असते, तर त्यांनी असा धर्माच्या नावाखाली गोंधळ घातला नसता,” असा उपरोधिक घणाघात सावंत यांनी शेवटी केला.