'दोन वर्षे खूप असतात, लॉकडाऊनसाठी नागरिक आता तयार होणार नाहीत' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

'दोन वर्षे खूप असतात, लॉकडाऊनसाठी नागरिक आता तयार होणार नाहीत'

पुणे: संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या कडक निर्बंध लागू केले जात आहेत. महाराष्ट्रामध्येही रुग्णसंख्येने चांगलाच जोर पकडला असून काल एका दिवसांत 18 हजार रुग्णसंख्येचा टप्पा राज्याने गाठलेला दिसून आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंधांबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केलं जाईल का, असा प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. याच प्रश्नावर आता भाजपचे प्रदेशाध्यशक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, लॉकडाऊनसाठी नागरिक आता तयार होणार नाहीत. २ वर्ष हा माणसाच्या जीवनातला फार मोठा कालावधी असून त्यांनी इतके दिवस सहन केले. त्यामुळे आतातरी सरकारने कसलेही कठोर निर्बंध लावले नाही पाहिजेत.

हेही वाचा: Bulli Bai : आरोपींची मोडस ऑपरेंडी काय? पोलिसांनी दिली माहिती

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील म्हणाले की, लॉकडाऊनला आता कुणीही तयार होणार नाही. दोन वर्षे हा माणसाच्या आयुष्यातला फार मोठा कालावधी आहे. यामध्ये विद्यार्थी, व्यापारी, खेळाडू, उद्योजक, शेतकरी असे सगळेच जण भरडले गेले आहेत. एवढा मोठा समजाचा वर्ग दोन वर्षे सहन केल्यानंतर पुन्हा पुढची किती वर्षे हे सहन करणार? असा प्रश्न त्यांनी केलाय.

हेही वाचा: Omicron : केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स; सीटी स्कॅनबाबत रुग्णांना सल्ला

पुढे त्यांनी म्हटलंय की, त्याच्याऐवजी सगळं रुटीन सुरु ठेवायचं पण काळजी घ्यायची. मास्क नाही लावला तर पाचशे रुपये दंड असेल तर ठिकाय. पाचशेचं हजार रुपये करावं. माझं म्हणणं असं आहे की कडक निर्बंध लादा. लग्नसमारंभ वगैरे पन्नास लोकांमध्ये करा. सभा-संमेलनं पन्नास जणांमध्ये करा. पण ऑफिसेस बंद करा, शाळा-कॉलेजेस बंद करा. दुकाने अमुक वेळ बंद करा, अशाने काहीही होणार नाहीये.

पुढे ते म्हणाले की, मी काही डॉक्टर नाहीये. पण हा रोग आता संपण्याच्या वाटेवर आहे. आता त्याचं स्वरुप भयावह उरलेलं नाहीये. सामान्य सर्दी-खोकल्याचं स्वरुप येतंय. आता कुठे व्यवहार रुळावर यायला लागलेत, तेंव्हा नो लॉकडाऊन, कडक निर्बंध हे अवलंबलं पाहिजे, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top