esakal | 'युती'त रंगला सत्तेचा सामना; शिवसेना समान वाटपावर ठाम!
sakal

बोलून बातमी शोधा

'युती'त रंगला सत्तेचा सामना; शिवसेना समान वाटपावर ठाम!
  • "युती'त रंगला सत्तेचा सामना 
  • फडणवीस म्हणतात मीच मुख्यमंत्री होणार 
  • शिवसेना मात्र  समान वाट्यावर ठाम 

'युती'त रंगला सत्तेचा सामना; शिवसेना समान वाटपावर ठाम!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'युती'मध्ये सत्तेचा सामना आणखी तीव्र झाला असून, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जिव्हारी लागलेल्या वाग्बाणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शिवसेनेवर पलटवार केला. शिवसेनेच्या दबावतंत्राला झुगारून लावत फडणवीस यांनी आज मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे स्पष्ट करीत सत्तेच्या वाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये 50-50 टक्‍क्‍यांचा कुठलाही फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही, तसेच मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी शिवसेनेला वाटून देण्याबाबतदेखील कुठलाही शब्द दिलेला नाही, असे त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यामध्ये नव्या सरकारचा शपथविधी अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांनी आज दिवाळीनिमित्त 'वर्षा'वर खास फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी साधलेल्या अनौपचारिक संवादामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक (105) जागा मिळाल्या असल्या, तरीसुद्धा बहुमताचे माप मात्र त्यांच्या पदरात पडलेले नाही. शिवसेनेने नेमक्‍या याच संधीचा फायदा उचलत सत्तेमध्ये अर्धा वाटा मागायला सुरवात केली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आम्ही मित्रपक्षाच्या सगळ्याच अडचणी समजून घेऊ शकत नाही, असे सांगत आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे म्हटले होते. "मातोश्री'वर झालेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये बहुतांश नेत्यांनी हीच ती योग्य वेळ असून, आताच सरकार बनवायला हवे, असा सूर आळवला होता. सत्तेमध्ये समान वाटा आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपददेखील वाटून घ्या, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी 'मातोश्री'च्या बाहेर आदित्य ठाकरे हेच भावी मुख्यमंत्री असतील, अशा आशयाचे बॅनरदेखील लावले होते. 

राज्यात भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होणार असून, काही मागण्या आम्ही मेरिटवर तपासून पाहू. पावसामध्ये भिजावे लागते, त्यात आम्ही कमी पडलो. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री  

लोकसभेआधी जे ठरले तेच द्यायचे आहे, आम्ही काहीही चुकीचे मागत नाही आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही. 
- संजय राऊत, नेते, शिवसेना 

टीका जिव्हारी 
शिवसेना-भाजपमधील अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे उद्या (ता. 30) "मातोश्री'वर येणार होते. पण, त्यांचा दौरादेखील रद्द झाल्याचे समजते. शिवसेनेच्या मुखपत्रातून सरकारवर होणारी टीका थांबत नाही तोवर त्यांच्याशी चर्चाच करू नका, अशा प्रकारची कठोर भूमिका भाजप नेत्यांनी घेतल्याचे समजते. 
 

फेसबुक पोस्ट
आदित्य ठाकरे यांनी संधी दवडू नये. कारण, राजकारणामध्ये अशा प्रकारची संधी पुन्हा मिळत नसते. जे मिळवायचे आहे ते त्यांनी आताच मिळवावे. लहान म्हणून कुणी थांबविण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नये. 
सत्यजित तांबे, अध्यक्ष, युवक कॉंग्रेस 


मुख्यमंत्री म्हणाले... 
- आम्ही राज्यात लवकरच सरकार स्थापन करू 
- काहीही बातम्या आल्या तरी सरकार आमचेच असेल. 
- उद्या (ता.30) बैठक आहे, त्यात नेता कोण हे स्पष्ट होईल 
- फर्स्ट आलो आहोत, आमच्या मेरिटबद्दल कोणीच बोलत नाहीत 
- सत्तास्थापनेचा मुहूर्त लवकरच कळेल, लवकरच फॉर्म्युला कळेल 
- आमच्याकडे फक्‍त "ए' प्लॅनच असल्याने "बी' प्लॅनची गरज नाही 
- पावसात भिजावे लागते, याचा अनुभव आम्हाला कमी पडला.

Webtitle : maharashtra mahayuti chaos shivsena firm on fifty fifty formula