अहमदनगरचं नामकरण अंबिकानगर, मनसेने ही मागणी का केली?

अंबिका नगर
अंबिका नगरई सकाळ

अहमदनगर ः औरंगाबादचं संभाजीनगर. अहमदनगरचं अंबिकानगर. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ही नावं दिली होती. पुढे शिवसेनेने (Shivsena) हीच भूमिका अनेक वर्षे लावून धरली. गेल्या काही वर्षांपासून हा मुद्दा मागे पडला आहे. तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) लावून धरला आहे. नगर शहराच्या स्थापना दिनी त्यांनी अंबिकानगर असं नामकरण करून बारसं घातलं. केडगावच्या वेशीपासून ते थेट माळीवाडा वेशीपर्यंतचे चौक, खांबांवर नामकरणाचे फलक डकवले आहेत. सोशल मीडियावर या नामकरण सोहळ्याचा व्हिडिओही त्यांनी शेअर केलाय. त्यामुळे नव्याने चर्चा सुरू झालीय.(Maharashtra Navnirman Sena changed the name of Ahmednagar)

या नामकरणाबाबत लवकरच कोर्टात धाव घेणार असल्याचेही मनसेने जाहीर करून टाकलंय. लॉकडाउननंतर पक्षाचे प्रमुख राज ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे यांना भेटून ही चळवळ व्यापक करणार असल्याचे मनसेचे सुमित वर्मा यांनी ई सकाळसोबत बोलताना सांगितले.

अहमदनगरच्या नामकरणास बहुतांशी लोकांचा विरोध आहे. तर काही समाज संघटनांनी अंबिकानगर नावाला वेगवेगळे पर्याय दिलेत. गेल्या काही वर्षांपासून हा वाद अधूनमधून उदभवत असतो. परंतु आता मनसेने केलेल्या नामकरणामुळे तो पुन्हा चेतण्याची शक्यता आहे. मधल्या काळात भाजपनेही नामकरणाबाबत उचल खाल्ली होती. त्यांनाही अहमदनगर हे नाव नको आहे.

योगी सरकारची मनसेला मदत

योगी सरकारने (Yogi government) उत्तर प्रदेशात बहुतांशी शहरांचे नामकरण केले आहे. नामकरणास कायदेशीर अधिष्ठान मिळावे यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. नगर शहराचे नाव अंबिकानगर असल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे. त्याच आधारे आम्ही ही मागणी लावून धरली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान ही संघटनाही नामकरणासाठी अनुकूल आहे. भिडे गुरूजी यांनीही नगरच्या सभेत अंबिकानगर अशी घोषणा केली होती. या चळवळीशी अनेकांची पूरक भूमिका आहे. समविचारी संघटनांसोबत संयुक्तरित्या बैठक घेऊन ती पुढे नेली जाणार आहे. लवकरच याबाबत कोर्टात याचिका दाखल केली जाईल, असेही मनसेचे वर्मा यांनी सांगितलं.

इतिहास काय सांगतो

२८ मे हा नगर शहराचा स्थापना दिन असतो. त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमही होतात. देशात हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्याच शहरांना जन्मदिवस माहिती आहे. त्यात नगरचा समावेश आहे. अहमद निजामशहाने सन २८ मे १४९४ रोजी हे शहर वसविल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. निजाम दरबारातील इतिहास लेखक फरिस्ता याच्या गुलशन ए इब्राहिमी या ग्रंथातही हा उल्लेख आहे. हीच नगरी त्याची पुढे राजधानी बनली. मलिक अहमद दौलताबादची मोहीम आटोपून राजधानी जुन्ररकडे परतत होता. तो बाग इ निजाम येथे थांबला. त्याच्या सैन्याची येथे छावणी होती. सीना नदीच्या काठावर असलेल्या या छावणीचे शहर बनले. परिसरातील कारागीर, शिल्पकार, गवंडी बोलावून घेत सतत दोन वर्षे ते काम करीत राहिले. शहराच्या कडेने वेशी उभारल्या गेल्या. दिल्ली दरवाजा, माळीवाडा वेस अजूनही त्याची साक्ष देतात. इस. १४९६ रोजी (हिजरी ९०२) शहर पूर्ण झाले. त्यानंतर अहमदशहाने जुन्नरची राजधानी नगरला हलवली. आणि नगरला सौंदर्य लाभले. या सौंदर्याची तुलना कैरो, बगदादसोबत केली जात.

छत्रपती शहाजीनगर करा

निजामशाहीच्या उत्तरार्धात छत्रपती शहाजीराजेंचे येथे वास्तव्य होते. सध्याच्या शहाजी रोड परिसरात त्यांचा वाडा होता. निजामशहाला राजगादीवर बसवून त्यांनी राज्यकारभार केला. स्वराज्याचे बीज याच नगरीतून रोवले गेले. त्यामुळे या नगरीला छत्रपती शहाजीराजेंचे नाव द्यायला हवे, असाही मतप्रवाह पुढे आला आहे. काहीजण चाँदबीबीच्या कर्तृत्वामुळे तिचेच नाव दिले पाहिजे, असे काही इतिहास प्रेमींचे म्हणणे आहे.

शहराचे धार्मिक महत्त्व

नगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणेशाचा (Shri vishal ganesh) गणेश पुरानात उल्लेख आढळतो. श्रीराम वनवासात असताना त्यांनी दंडकारण्यातील या गणेशाला नवस केल्याच्याही कथा सांगितल्या जातात. ही भूमी भृंग ऋषी यांची आहे, असे काही भक्त सांगतात. विशाल गणेशाच्या दर्शनास नाथपंथिय साधू येत असतात. कुंभमेळाव्याला जाताना येथील मंदिरात थांबतात.

फरिस्ता इतिहासकाराने केलेला उल्लेख

ऐतिहासिक दस्तावेज निजामकालापासून उपलब्ध आहेत. अहमद निजामशहाच्या दरबारातील फरिस्ता या इतिहास लेखकाने नगरच्या स्थापनादिनाबद्दल केलेला उल्लेख सापडतो. तेव्हाच नगर शहराची स्थापना झाली असे मानले जाते. परंतु नगर शहराच्या जवळच भिंगार शहर आहे. त्याचा पौराणिक ग्रंथातही उल्लेख सापडतो. भृंग ऋषी यांची ती तपोभूमी आहे. पूर्वी ते नाव असल्याचे काहीजण सांगतात. निजामशाहीनंतर मोगलांनी हे शहर खंडहर करून टाकले. पेशव्यांनी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देऊन येथे वस्ती करण्यास सांगितले, असेही उल्लेख इतिहासात आहेत.

-प्रा.डॉ. संतोष यादव, अभिरक्षक ऐतिहासिक वस्तु संग्रहालय.

स्थापना आणला कुठून...

आमच्याकडे धार्मिक आणि ऐतिहासिक पुरावे आहेत. ते पुरावे आम्ही कोर्टात सादर करू. सरकारलाही नामकरण करण्यास भाग पाडू. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९९५मध्ये नगरमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर (Ambikanagar) करून टाकले होते. केडगाव उपनगरात अंबिका देवी आहे. तिचेही पौराणिक महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही देवीच्या नावावरून ही मागणी लावून धरली आहे. शहराचा स्थापना दिन मानत नाहीत.

- सुमित वर्मा, मनसे.

(Maharashtra Navnirman Sena changed the name of Ahmednagar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com